लंडन ऑलिम्पिकमधील भारताचा मल्ल योगेश्वर दत्तच्या रौप्यपदकाच्या आशा मावळल्या आहेत. या स्पर्धेत योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते, तर रशियाचा मल्ल बेसिक कुडूकोव्हने रौप्यपदक पटकावले होते. पण या स्पर्धेत कुडूकोव्हने उत्तेजक घेतल्याचे वृत्त प्रसारीत झाल्याने योगेश्वरला रौप्यपदक मिळेल, अशी आशा भारतीयांना होती. पण कुडूकोव्हच्या उत्तेजक सेवनाचा तपास थांबवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे. त्यामुळे योगेश्वरला रौप्यपदकावर बढती मिळू शकणार नाही. पण या गोष्टीबाबत भारतीय कुस्ती महासंघ अनभिज्ञ आहे.

कुडूकोव्हचा २०१३ साली कार अपघातात मृत्यू झाला होता. २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये घेण्यात आलेल्या जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या (वाडा) चाचणीमध्ये कुडूकोव्ह दोषी आढळला होता.

रशियन कुस्ती महासंघाने याबाबत सांगितले की, ‘कुडूकोव्हचे २०१२ साली घेतलेल्या नमुन्यांची यावर्षी पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याने उत्तेजक घेतल्याचे सांगितले गेले. त्यानंतर या चाचणीचा अहवाल आयओसीच्या शिस्तपालन समितीपुढे सादर करण्यात आला. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय या समितीनेच घ्यायला हवा.’

याबाबत जागतिक कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष जॉर्जी ब्रीयुसोव्ह यांनी सांगितले की, ‘ कुडूकोव्हचे रौप्यपदक काढून घेण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला नाही.’

‘रिओ ऑलिम्पिकपूर्वी २०१२ च्या ऑलिम्पिकमधील कुडूकोव्ह उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे आम्हाला कळवण्यात आले होते. त्यामुळे योगेश्वरची कांस्यवरून रौप्यपदकावर बढती होणार होती. पण आजतागायत याबाबत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही,’ असे भारतीय कुस्ती महासंघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.