आक्रमक फलंदाजांची मांदियाळी असलेल्या बंगळूरु संघाचा ४९ धावांत खुर्दा उडवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचे रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघापुढे आव्हान असेल. या दोन संघांमध्ये येथे बुधवारी होणारा आयपीएलचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. पुण्याने नुकत्याच झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर सनसनाटी विजय नोंदविला होता.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीबाबत कोलकात्याची बाजू वरचढ मानली जात असली तरी घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा पुण्याला मिळण्याची शक्यता आहे. सलामीवीर राहुल त्रिपाठी याची सातत्यपूर्ण कामगिरी पुण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. महाराष्ट्राच्या या खेळाडूला पुन्हा घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ मिळणार आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने एकूण १३५ धावा केल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने विजय मिळविणाऱ्या खेळाडूची भूमिका समर्थपणे बजावली आहे. त्याला सूर गवसला ही पुण्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. अजिंक्य रहाणे व स्टीव्हन स्मिथ यांनीही चमक दाखविली असली तरी त्यांच्याकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे. बंगळूरुची भंबेरी उडवणाऱ्या कोलकात्याच्या गोलंदाजांपुढे हे फलंदाज कशी कामगिरी करतात याची उत्सुकता आहे.   गोलंदाजीत बेन स्टोक्स, अशोक दिंडा, शार्दूल ठाकूर व जयदेव उनाडकट या वेगवान गोलंदाजांवर पुण्याची भिस्त आहे. फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यानेही प्रभावी कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदर या युवा गोलंदाजाने शिस्तबद्ध गोलंदाजी करीत संघाने त्याच्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे.

पुण्याच्या तुलनेत कोलकाताने चांगले यश मिळविले आहे. त्यांनी सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. कर्णधार गौतम गंभीर, सुनील नरिन, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. दिल्लीविरुद्ध युसूफ याने संघास पराभवाच्या छायेतून विजय मिळवून दिला होता. कोलकाताचा ख्रिस वोक्सने आतापर्यंत या स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये दहा गडी बाद केले आहेत. त्याच्याबरोबरच नॅथन कल्टर- निल, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. फिरकी गोलंदाजीबाबत नरिन व कुलदीप यादव यांच्यावर त्यांची मदार आहे.

संभाव्य संघ

रायझिंग पुणे सुपरजायंट्स : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मयांक अगरवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बैन्स, रजत भाटिया, दीपक चहार, राहुल चहार, अशोक दिंडा, जसकरण सिंग, अजिंक्य रहाणे, सौरभ कुमार, मिलिंद टंडन, मनोज तिवारी, जयदेव उनाडकट, अ‍ॅडम झंपा, बेन स्टोक्स, उस्मान ख्वाजा, लॉकी फग्र्युसन, फॅफ डू प्लेसिस.

कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), पीयूष चावला, ऋषी धवन, सयान घोष, शेल्डॉन जॅक्सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, मनीष पांडे, युसुफ पठाण, सूर्यकुमार यादव, अंकित राजपूत, संजय यादव, रॉबिन उथप्पा, उमेश यादव,ख्रिस वोक्स, शकीब अल हसन, रोव्हमन पॉवेल, ख्रिस लिन, सुनील नरिन, नॅथन कोल्टिअर नील, ट्रेंट बोल्ट.

वेळ : रात्री ८.०० वा. पासून.

थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स आणि सोनी इएसपीएन वाहिन्यांवर.