भारतीय प्रिमिअर लीग म्हणजेच ‘आयपीएल’ची स्पर्धा ही खेळ आहे की व्यवसाय? या उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देत ही स्पर्धा खेळच असल्याचा दावा केला. त्यामुळे पाणी नियोजन धोरणानुसार चौथ्या श्रेणीत ‘खेळा’चाही समावेश होत असल्याचे ‘एमसीए’ने न्यायालयाला सांगितले. तसेच पाणी वाटपाचा मुद्दा जर केवळ ‘आयपीएल’पुरता मर्यादित ठेवण्यात येत असेल तर ते चुकीचे असून त्यामध्ये अन्य खेळ आणि सिनेमागृह, मॉलचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी ‘एमसीए’ने केली.

पाणी नियोजनाच्या धोरणानुसार, आतापर्यंत या सामन्यांसाठी व्यावसायिक व औद्योगिक श्रेणीतून पाणी देण्यात येत होते हे उघड झाल्यानंतर ‘आयपीएल’ हा खेळ आहे की व्यवसाय आहे, असा सवाल न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी केला होता. ‘आयपीएल’ हा खेळ असेल तर त्याकरिता देण्यात येणारे पाणी हे या श्रेणीतून दिले जाऊ शकते का, अशी विचारणाही न्यायालयाने केली होती. त्यातच राज्य सरकार या स्पर्धेला मनोरंजन कर आकारत असल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आल्यावर ‘आयपीएल’ हे नेमके काय आहे याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने ‘एमसीए’ला दिले होते.  वानखेडेवर क्रिकेटवगळता अन्य कुठले खेळ वा कार्यक्रम आयोजित केले जातात, ते खेळ की व्यावसायिक कार्यक्रम असतात, याचा तपशील देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.