शेतमजुरी आणि ऊसतोडणीला जुंपलेल्या आई-वडिलांकडून त्यांच्या मुलांना भारत धनले यांनी जणू दत्तकच घेतले आणि साई क्रीडा मंडळाचा आसरा दिला. त्यांना कबड्डीचे धडे दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या शिक्षणाचेही शिवधनुष्य पेलले. मुळात धनले यांच्या घरची स्थितीसुद्धा बेताची. त्यामुळे कबड्डीच्या ध्यासाने त्यांना कर्जबाजारी बनवले. पण त्यांनी घेतला वसा टाकला नाही. पाहता पाहता या वृक्षाला आता रसाळ गोमटी फळे येऊ लागली. साई संघाची पताका डौलाने फडकू लागली. आता वर्षांला मिळणाऱ्या सुमारे पाच लाखांच्या बक्षिसांच्या कमाईतून या निवासी अकादमीचे कार्य सुरू आहे. आता अनेक निवासी अकादमी परभणीत निर्माण झाल्या आहेत. किंबहुना हेच तेथील कबड्डीचे ऑक्सिजन आहे.

साधारण १९९६-९७मध्ये धनले यांना कबड्डीची अकादमी काढण्याच्या ध्यासाने झपाटले. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह किराणा मालाच्या दुकानामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून चालायचा. शेतमजुरी आणि ऊसतोडणीच्या कामावर येथील बऱ्याच कुटुंबाचा चरितार्थ चालतो. या परिस्थितीत खेळाडू घडणार कसे, हा प्रश्न धनले यांना भेडसावला. पोटाच्या प्रश्नामुळे वेळप्रसंगी अनेक मुलांचे शिक्षणसुद्धा अर्धवट सुटायचे. त्या वेळी साईबाबांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथरी येथे साई क्रीडा मंडळाचे रोपटे धनले यांनी लावले. याबाबत ते म्हणाले, ‘‘सुरुवातीच्या काळात १२-१३ मुले होती. त्या वेळी आर्थिक घडी बसवणे बरेच कठीण जायचे. काही मंडळी स्वत:हून धान्य, भाज्या, आदी मदतसुद्धा द्यायची.’’

परभणी आणि हिंगोली कबड्डीच्या नकाशावर एकत्रित असताना १९९२मध्ये मंगल पांडे यांनी सरस्वती व्यायाम प्रसारक मंडळ या नावानं येथे पहिली निवासी अकादमी सुरू केली. श्री साई सेवा क्रीडा प्रसारक मंडळ ही दुसरी अकादमी नंतर अस्तित्वात आली. दिगंबर जाधव, ज्ञानेश्वर गिरी, माधव शिंदे हे कबड्डीपटू या संघातून घडले. मग १९९५मध्ये यशवंतराव चव्हाण व्यायाम प्रसारक मंडळ सुरू झाले. परंतु या सर्वाच्या तुलनेत अधिक वेगाने प्रगती साई क्रीडा मंडळाने केली. याबाबत धनले म्हणाले, ‘‘मराठवाडा-विदर्भातील प्रामुख्याने १२ ते १७ वयोगटातील मुलांचा अकादमीत समावेश आहे. पहाटे ४ वाजता येथील दिनक्रम सुरू होतो. मैदानावर सराव होतो, शाळेच्या वेळेत ही मुले शाळेत जातात. याचप्रमाणे सायंकाळी त्यांचा अभ्यास घेतला जातो. मुलांचे जेवण, नाश्ता, आदी सर्व गोष्टींची जबाबदारी मंडळ उचलते.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘भुजंग डुकरे, शिवम जाधव, माधव चव्हाण, रणजित म्हस्के, सुनील धनले, अंकुश राठोड, अनिल जाधव, अप्पा वराडे, अशोक कांबळे, संदीप राठोड, भागवत डुकरे यांच्यासारख्या खेळाडूंनी साई संघाची पताका फडकवत ठेवली आहे. विविध वयोगटांमध्ये संघाचे खेळाडू स्थान मिळवतात. कबड्डीतील कौशल्याचा विकास साधण्यासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन केले जाते. पुढील शैक्षणिक वर्षांपासून मुलींचा संघसुद्धा तयार करण्यात येणार आहे.’’

परभणीत सध्या कार्यरत असलेल्या दहा निवासी अकादमींच्या बळावर येथील कबड्डीला मोठी रसद मिळते आहे. जाणता राजा, अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ ज्ञानतीर्थ, राजे शिवाजी क्रीडा मंडळ, महारुद्र क्रीडा मंडळ यांचा यात समावेश आहे.

जिजाऊ ज्ञानतीर्थ निवासी विद्यालय

जिजाऊ ज्ञानतीर्थ निवासी विद्यालयानेसुद्धा कबड्डीपटू घडवण्याच्या प्रेरणेने शिक्षणापासून वंचित मुलांना मोफत प्रवेश दिला आहे. क्रीडा शिक्षक सुरेश भिसे यांनी चार वर्षांपूर्वी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. आता एक उत्तम संघ म्हणून या शाळेचा रुबाब आहे. याबाबत भिसे म्हणाले, ‘‘आमच्या वसतिगृहात कडक शिस्त असते. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंतच्या प्रत्येक कार्याचे वेळापत्रक निश्चित असते. यात सकस आहार, योगासने, व्यायाम, तंदुरुस्ती आणि कौशल्य विकास यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कबड्डीमधील उगवती गुणवत्ता शिक्षणअभावी वाया जाण्याची चिन्हे होती. तिला योग्य दिशा देण्याच्या प्रेरणेने अशा कबड्डीपटू विद्यार्थ्यांना शाळेत आणले आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.’’

राजे शिवाजी क्रीडा मंडळ

गुलाब भिसे या पोलीस कर्मचाऱ्यानंसुद्धा राजे शिवाजी क्रीडा मंडळ या नावाने कोल्हा येथे निवासी अकादमी सुरू केली आहे. भिसे यांनी वर्षभरापूर्वी हा ध्यास घेतला. आता त्यांच्या अकादमीत सुमारे २५ विद्यार्थी आहेत. संस्थेकडे स्वत:ची जागा नसल्यामुळे भाडय़ाने घेतलेल्या खोलीत ही मुले राहतात. तिथेच शाळा-महाविद्यालयाचे शिक्षण घेतात आणि अभ्यास करतात. याविषयी भिसे म्हणाले, ‘‘अर्थकारण सांभाळणे हे खरेच आव्हानात्मक असते. परंतु आम्ही प्रवेश देताना संख्येपेक्षा दर्जाला अधिक महत्त्व देतो.’’

 साई स्पोर्ट्स अकादमी

साई स्पोर्ट्स अकादमीचे कार्यसुद्धा अशाच प्रकारे चालते. आसपासच्या छोटय़ा-मोठय़ा गावांमधील गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सांभाळून त्यांना कबड्डीच्या वाटेवर आणण्याचा हा प्रयत्न या संस्थेकडून माधव शिंदे, फुलचंद अगरवाल आणि मधुकर गुठ्ठे गेली अनेक वष्रे करीत आहेत. या अकादमीबाबत शिंदे म्हणाले की, ‘‘शेती आणि ऊसतोडणी यामुळे शिक्षण घेणे आणि खेळाडू घडणे हे आमच्या भागात कठीण झाले होते. त्यामुळेच आम्ही अकादमीच्या माध्यमातून ही खेळीची सेवा करीत आहोत. आता २२ मुले आमच्या अकादमीत आहेत.’’

ग्रामीण भागातील खेळाडूंची शिक्षणाची आणि दोन वेळच्या जेवणाची ऐपत नाही. या अकादम्या अशा वस्त्या किंवा तांडय़ांमधून खेळाडू हेरतात आणि त्यांना आपल्याकडे आणतात. सुमारे दोन दशके चालू असलेल्या या उपक्रमांतील अनेक खेळाडू आता उत्तम नोकरीला आहेत. यापैकी बहुतांशी पोलीस दलात नोकरीला आहेत. मुलांचे भले होतेय. तो शाळेत जातोय, या प्रेरणेने आई-वडीलसुद्धा आवडीने त्यांना पाठवतात.  प्रा. माधव शेजूळ, कबड्डी संघटक