कोलकाता नाइट रायडर्सचा आघाडीचा फिरकीपटू सुनील नरिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी त्याला गोलंदाजीच्या संशयास्पद शैलीची चेन्नईत चाचणी करावी लागणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी दिली.
‘‘माझे कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यवस्थापनाशी बोलणे झाले आहे. नरिनला पुन्हा ही चाचणी द्यावी लागणार आहे. ती एकदा
किंवा दोनदा असेल,’’ असे दालमिया यांनी सांगितले. ही चाचणी चेन्नईच्या श्री रामचंद्र विद्यापीठात होणार आहे.
संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे नरिनवर २०१४च्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेपासून बंदी घातली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नरिनला खेळता आले नव्हते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकातावर विजय मिळवला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, त्या वेळीसुद्धा नरिनला वगळण्यात आले होते. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत तो खेळला नव्हता.