क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा खेळ आणि गोलंदाज म्हणजे धावांच्या फॅक्टरीत भरडून निघणारी माणसं याचा पुरेपूर प्रत्यय इंग्लंडमधील एका क्लब सामन्यात आलेल्या धावांच्या महापुराने सिद्ध झाले. नॅन्टविच संघाच्या लायम लिव्हिंगस्टोनने काल्डी संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ३५० धावांची विक्रमी खेळी साकारली. २१ वर्षीय लायमने या तडाखेबंद खेळीदरम्यान तब्बल ३४ चौकार आणि २७ षटकारांची खैरात केली. लायमच्या या अद्भुत खेळीच्या जोरावर नॅन्टविचने ५७९ धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे नॅन्टविचची धावांची टांकसाळ थांबल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत काल्डी संघाचा डाव ७९ धावांत गुंडाळला. नॅन्टविचने ५०० धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला.
राष्ट्रीय क्लब अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यातल्या लायमच्या या खेळीने प्रथम श्रेणी तसेच एकदिवसीय प्रकारातील असंख्य विक्रम मोडीत निघ़ाले. लायम लँकेशायर संघाचा भाग असून, त्याने अद्याप एकही प्रथम श्रेणीचा सामना खेळलेला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या संकेतस्थळानुसार, लायमची खेळी एकदिवसीय प्रकारातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. लायमने निखिलेश सुरेंद्रनचा ३३४ धावांचा विक्रम मोडला.
‘शतक झळकावल्यानंतर प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकण्याचा माझा प्रयत्न होता. दोनशे आणि त्यानंतर तीनशे धावा केल्या त्या वेळी आपल्या हातून काही अद्भुत साकारते आहे याची जाणीव झाली. खेळपट्टी संथ आणि धिमी होती. मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थितपणे येत होता. साडेतीनशे धावांची खेळी केली आहे यावर अद्याप विश्वास बसलेला नाही. मात्र माझ्यासाठी हा अभिमानास्पद दिवस आहे. योगायोगाने या खेळीदरम्यान माझे आई-वडील मैदानात उपस्थित होते’, असे लायमने सांगितले.