स्पेनविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी भारतीय संघात लिअँडर पेस याचे स्थान कायम राहिले आहे. ही लढत १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान होईल. दक्षिण कोरियावर मात करणाऱ्या भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन हे एकेरीचे सामने खेळणार आहेत. दुहेरीत पेस व रोहन बोपण्णा हीच जोडी खेळणार आहे. या जोडीस रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

डेव्हिस चषक लढतीसाठी राखीव खेळाडू म्हणून विष्णू वर्धन याच्या ऐवजी प्रज्ञेश गुणेश्वरन याला संधी देण्यात आली आहे. सुमीत नागल याचे स्थान कायम राहिले आहे.

दुहेरीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्याबाबत विचारले असता निवड समितीचे प्रमुख एस.पी.मिश्रा यांनी सांगितले, स्पेनसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याविरुद्ध कोणताही नवीन प्रयोग करणे हे चुकीचे ठरले असते. सद्यस्थितीत पेस व बोपण्णा हीच सर्वोत्तम जोडी आहे. तसेच युकी भांब्री व सोमदेव देववर्मन हे दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतग्रस्त असल्यामुळे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.