आठवडय़ाची मुलाखत : नितीश राणा, मुंबई इंडियन्सचा फलंदाज

मुंबई इंडियन्सचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून आता दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा नावारूपास आला आहे. दिल्लीत गौतम गंभीरच्याच स्थानिक संघाकडून खेळणारा नितीश मागील राष्ट्रीय हंगामात जेव्हा अपयशी ठरला होता, तेव्हा गंभीरच्या दिशादर्शक शब्दांनी त्याला सावरले. याशिवाय मुंबई इंडियन्सकडून गेली दोन वष्रे खेळताना रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने या प्रशिक्षकांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनामुळे फलंदाजीचा दृष्टिकोन बदलला आणि तेच यशाचे खरे कारण असल्याचे राणाने सांगितले. यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत ९ सामन्यांत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक २८५ धावा काढणाऱ्या राणाशी केलेली खास बातचीत-

  • यंदाच्या हंगामात तू मुंबईचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून सिद्ध झाला आहेस. या प्रवासाबाबत तू काय सांगशील?

कोणत्याही युवा खेळाडूसाठी स्वप्नवत म्हणावा, असा माझा आयपीएलमध्ये प्रवास सुरू आहे. मागील स्थानिक हंगाम माझ्यासाठी फारसा चांगला ठरला नव्हता. गेल्या वर्षी दिल्लीत स्थानिक क्रिकेट खेळत असताना माझ्या एका मित्राने मला आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सकरिता निवड झाल्याचे सांगितले. पण माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. हा फार मोठा संघ असल्यामुळे मी अजिबात अशी अपेक्षा केली नव्हती. मुंबईसाठी मैदानावर उतरलो, तेव्हा जणू स्वप्न सत्यात उतरल्याचीच अनुभूती मला आली. दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता माझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे.

  • फटकेबाज फलंदाज म्हणून विकसित होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पाँटिंगने तुला कशा प्रकारे मार्गदर्शन केले?

मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नामांकित क्रिकेटपटूंकडून तुम्हाला मार्गदर्शनाचे धडे मिळतात. पाँटिंगसारख्या महान खेळाडूचा प्रत्येक सल्ला माझ्यासाठी मोलाचा ठरला. महेला जयवर्धने, जाँटी ऱ्होड्स, रॉबिन सिंग आणि शेन बाँड यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शनसुद्धा वारंवार मिळत असते.

  • मागील स्थानिक हंगाम तुझ्यासाठी अयशस्वी ठरला होता. सध्याचे यश मिळवण्यासाठी तुला कोणाच्या मार्गदर्शनाने प्रेरणा दिली?

मागील स्थानिक हंगाम माझ्यासाठी फारसा चांगला ठरला नव्हता. त्याच्या आधीच्या हंगामाप्रमाणे धावा माझ्याकडून झाल्या नाहीत. याचा गांभीर्याने विचार करू लागल्याने माझ्या फलंदाजीवरही त्याचा परिणाम दिसू लागला. मात्र गौतम गंभीरने माझ्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात काही बदल सुचवले. त्यानंतर मार्चमध्ये मुंबई इंडियन्समध्ये रुजू झाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि महेला जयवर्धने यांनी फलंदाजीच्या तंत्राबाबत मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या कोणत्याही शंकांचे निरसन करून सुधारणा होण्याच्या उद्देशाने सचिन आमच्यासोबत नेहमी असतो, हेच मुंबईचे बलस्थान म्हणता येईल.

  • मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिग्गज क्रिकेटपटूंचा कसा फायदा होतो?

मुंबईच्या संघात एकापेक्षा एक दिग्गज क्रिकेटपटूंचा भरणा आहे. त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या खेळाडूला सामन्यागणिक त्यांच्या अनुभवाचे आणि ज्ञानाचे धडे नेहमी मिळत असतात. रोहित शर्मा, हरभजन सिंग, लसिथ मलिंगा आणि किरॉन पोलार्ड यांच्याकडून बरेच काही मी शिकलो आहे.

  • क्रिकेटपटू म्हणून कोणते स्वप्न तू जोपासले आहेस?

भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न देशातील प्रत्येक क्रिकेटपटू जीवापाड जपतो, मीही त्याला अपवाद नाही. परंतु सध्या तरी मी मुंबई इंडियन्सच्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडत आहे. सध्या तरी बाद फेरी गाठणे, हे मुंबईचे प्रमुख लक्ष्य आहे. माझ्या फलंदाजीचा मी मनसोक्त आनंद लुटत आहे.

  • एक क्रिकेटपटू म्हणून आयुष्यात जसे घडेल, तसा त्याचा सामना करावा, अशी तुझी विचारसरणी आहे की प्रत्येक वेळी स्वत:समोर नवे आव्हान ठेवतोस?

भविष्यातील गोष्टींचा फार विचार करण्यापेक्षा प्रत्येक वेळी पुढील एका सामन्याचा किंवा दिवसाचा मी विचार करतो. प्रदीर्घ काळाचे लक्ष्य समोर ठेवण्यापेक्षा छोटेखानी लक्ष्य असणे, कधीही चांगले असते.

  • आयुष्यात नशिबाला तू किती महत्त्व देतोस?

नशिबाचे आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान असते, परंतु कोणत्याही यशाचा पाया म्हणजे मेहनत असे मी मानतो. एक क्रिकेटपटू म्हणून नशिबाकडे लक्ष केंद्रित करून त्याचा विचार करण्यापेक्षा मेहनत करून खेळ सुधारणे, हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.