पुण्याच्या साक्षी करे हिला ‘ईला’ तर शुभम थोरातला ‘भरत’ पुरस्कार

भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या २७ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) आणि २६ व्या पुरुष व महिला फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पध्रेत महाराष्ट्राने चारही विजेतेपदांवर मोहर उमटवली आणि गतवर्षी सांगलीतल्या निकालांची पुनरावृत्ती केली. किशोरी गटात दिला जाणारा ईला पुरस्कार महाराष्ट्राच्या साक्षी करेने तर किशोर गटातील भरत पुरस्कार महाराष्ट्राच्या शुभम थोरातने पटकावला.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने रोमहर्षक सामन्यात कोल्हापूरचा १६-१३ असा ३ गुणांनी पराभव करून अजिंक्यपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या कर्णधार महेश िशदे (१.३० मि., ३ मि.), दीपक माने (३ मि.), प्रयाग कनगुटकर (२ मि., १.२० मि., १ गडी), मुकेश गोसावी (२ मि. व २ गडी) व नितीन ढोबळे (५ गडी) यांनी शानदार खेळ केला. कोल्हापूरच्या आदित्य येवरे (२ मि.), सागर पटदूर (४ गडी) व सचिन पाटील (४ गडी) यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-८ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला महाराष्ट्र २ गुणांनी पिछाडीवर होता; परंतु दुसऱ्या डावात कर्नाटकचे ९ गडी टिपून महाराष्ट्राने सामन्यावर नियंत्रण मिळवले व संरक्षणात केवळ ४ गडी गमावून विजेतेपद कायम राखले. विजयी संघाच्या ऐश्वर्या सावंत (३.३० मि. व ३.२५ मि.), श्वेता गवळी (२.४५ मि.), शीतल भोर (५ गडी) व कविता घाणेकर (२.१५ मि.) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.  महाराष्ट्राच्या किशोर संघाने झारखंडवर ८-७ अशी एक गुण व २.३० मिनिटे राखून मात केली. महाराष्ट्राच्या शुभम थोरातने पहिल्या डावात २.३० मि. व दुसऱ्या डावात तब्बल ७ पकी ५ मिनिटे संरक्षण करून झारखंडच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. शुभमला ऋतिक भोर (१.३० मि. नाबाद व १ गडी), राहुल जाधव (१.३० मि.) व आदित्य देसाई (१.१० मि., १.२० मि., २ गडी) यांनी छान साथ दिली.

किशोरी गटात महाराष्ट्राने कर्नाटकचे कडवे आव्हान ११-९ असे २ गुणांनी मोडून काढले. साक्षी करे (१.१० मि., २.२० मि.), ऋतुजा हाके (२.१० मि., १.३० मि.), हर्षदा करे (१.२० मि., १.३० मि. व १ गडी),  प्राजक्ता चितळकर (३ गडी) यांनी विजयश्री खेचून आणली.