गेल्या मोसमात इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या मँचेस्टर युनायटेडला या मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. नेदरलँड्सचे जादुई प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांच्या नेतृत्वाखाली पहिला स्पर्धात्मक सामना खेळणाऱ्या मँचेस्टर युनायटेडला स्वानसी सिटीने १-२ असे पराभूत केले.
दक्षिण कोरियाचा मधल्या फळीतील खेळाडू कि संग-युएंग याने २८व्या मिनिटाला डाव्या पायाने गोल करत स्वानसी सिटीला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला कर्णधार वेन रूनीने गोल करून मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून दिली. पण ७२व्या मिनिटाला गिल्फी सिगर्डसन याच्या निर्णायक गोलमुळे स्वानसी सिटीने विजय साकारला. १९७२नंतर प्रथमच यजमान मँचेस्टर युनायटेडला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला.
‘‘घरच्या मैदानावर पहिलाच सामना गमवावा लागल्यामुळे मी निराश झालो आहे. पहिल्या सत्रात चुकीचे निर्णय घेतल्याचा फटका आम्हाला बसला. दुसऱ्या सत्रात आम्ही सांघिक खेळ करू शकलो नाही. पराभवाला मीच कारणीभूत आहे,’’ असे व्हॅन गाल यांनी सांगितले.