ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ विजय मिळवेल, असे वाटत होते, पण त्यांच्या पदरी पराभवच पडला. यामागचे कारण ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने सांगितले आहे. भारतीय संघाला आपण परदेशात जिंकू शकतो, हा आत्मविश्वासच नाही, असे हेडनने म्हटले आहे.
‘‘परदेशामध्ये जाऊन आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वाच त्यांच्यामध्ये नाही. दिवसाची सुरुवात चांगली होवो किंवा वाईट, त्यानंतर सामन्यामध्ये भारताला परतता आलेले नाही. महत्त्वाच्या क्षणी त्यांनी सामन्यावरची पकड गमावली,’’ असे हेडनने ‘दी डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील आपल्या स्तंभात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाताना आम्ही आक्रमकतेला जशास तसेच उत्तर देऊ, असे म्हटले होते. पण भारतीय संघाला आक्रमकतेचा खरा अर्थ माहिती नसल्याचे हेडन लिहितो.
‘‘भारतीय संघाला आक्रमकता काय, हेच नेमके माहिती नाही. ऑस्ट्रेलियाच्या वीस विकेट्स काढण्याची गुणवत्ता भारताच्या गोलंदाजांमध्ये आहे, पण त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही. त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळाले नाही,’’ असे हेडन म्हणतो.