ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे दोन माजी खेळाडू सध्या एकमेकांवर बेछुट टीका करत असल्याने क्रिकेटविश्व ढवळून निघाले आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर दोनही खेळाडूंनी आपल्या आत्मचरित्रात केलेल्या गौप्यस्फोटांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने संघातील खेळाडूंच्या वर्तणुकीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळ उडवून दिली असताना आता क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्विकारलेल्या गोलंदाज मिचेल जॉन्सन याने धक्कादायक विधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना जॉन्सन याने मायकेल क्लार्कच्या नेतृत्त्वाखाली खेळणे हा संघातील अनेक खेळाडूंसाठी वाईट अनुभव होता, असे विधान केले आहे. जॉन्सनच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. क्लार्कच्या नेतृत्त्वपदाच्या काळात ड्रेसिंगरुममधील वातावरण ‘विषारी’ झाले होते, असेही धक्कादायक विधान जॉन्सन याने केले आहे.
मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका गमावल्यानंतर निवृत्ती स्विकारलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्लार्कच्या नेतृत्त्वाखाली खेळण्याची इच्छाच नव्हती, असेही तो पुढे म्हणाला. २०१२ साली रिकी पॉन्टिंगकडून कर्णधारपदाची धुरा क्लार्कने स्विकारल्यानंतर संघाला जणू अपंगत्व प्राप्त झाले होते, असा आरोप जॉन्सन याने केला. क्लार्कच्या नेतृत्त्वात आमच्याकडून संघ म्हणून काम होत नव्हते. ड्रेसिंग रुममधील वातारण विचित्रच होते. सर्वांना त्याची जाणीव होती, पण ते स्पष्टपणे सांगू शकत नव्हते, असेही तो पुढे म्हणाला.