नील नार्वेकरने फक्त २९ चेंडूंत साकारलेल्या वेगवान शतकाच्या बळावर पार्कोफेने क्रिकेटर्स संघाने डॉ. एच. डी. कांगा क्रिकेट लीग स्पध्रेच्या ‘ब’ विभागात यजमान खार जिमखाना संघाला पराभूत केले.
खार जिमखाना येथील या सामन्यात एकंदर ९०० धावांची लयलूट झाली. खार जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. यात रवी शिंदेच्या ११८ आणि अर्जुन शेट्टीच्या ९६ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरादाखल पार्कोफेने संघाने ९ बाद ४९२ धावा केल्या. यात पृथ्वी शॉ (११०), पराग खानापुरकर (११०) आणि नार्वेकर (३० चेंडूंत १०३ धावा) यांच्या शतकांचा समावेश आहे. पार्कोफेने संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर हा सामना जिंकला आणि गटातील अव्वल स्थान राखले. खार जिमखान्याच्या विवेक आराटेने १३२ धावांत ७ बळी घेतले.
नीलने आपल्या घणाघाती खेळीत ६ चौकार आणि १२ षटकार ठोकले. या खेळीबाबत नार्वेकर म्हणाला, ‘‘मी ९६ धावांवर असताना ड्रेसिंग रूममधून मला संदेश आला की फक्त सात मिनिटांचा खेळ बाकी आहे. मी पुढच्याच चेंडूवर षटकार खेचून २९ चेंडूंत शतक झळकावले. अशा प्रकारे वेगवान शतक साकारू शकेन, असा कधीच विचार मी केला नव्हता. मला वेगाने धावा करायच्या होत्या.’’