बुद्धिबळातील अनभिषिक्त सम्राट समजल्या जाणाऱ्या विश्वनाथन आनंदचे साम्राज्य खालसा करून २२ वर्षांच्या मॅग्नस कार्लसनने युवा पटसम्राट होण्याचा मान पटकावला. गॅरी कास्पारोव्ह यांच्यासह २२व्या वर्षी विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवणारा तो जगातील सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे. माजी विश्वविजेत्या आनंदविरुद्धचा १०वा डाव बरोबरीत सोडवत कार्लसनने जगज्जेतेपदाला गवसणी घातली.
गुरुवारी नवव्या डावात आनंदवर सनसनाटी विजय मिळवून कार्लसनने ६-३ अशी आघाडी घेत विश्वविजेतेपदाच्या दिशेने कूच केली होती. विश्वविजेतेपदासाठी उर्वरित तीन डावांत अवघ्या अध्र्या गुणाची आवश्यकता असणारा कार्लसन हाच विश्वविजेता होणार, हे त्याचा या स्पर्धेतील खेळ आणि फॉर्म यावरून जाणवत होते. शुक्रवारी काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने कडवी झुंज देऊन विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण कार्लसनने आपल्या बचावात्मक खेळाद्वारे आनंदचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.