एन. श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याने म्हटले जात होते. पण बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छ्रु नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पवार यांनी २००५-०८ या कालावधीमध्ये बीसीसीआयबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवले होते. सद्यस्थितीत आयसीसीच्या अध्यक्षपदावर पुन्हा जाण्याची त्यांची इच्छा असल्याचे म्हटले जात होते. पण पवार यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत या चर्वितचर्वणाला पूर्णविराम दिला आहे.
‘‘बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मी अजूनही विचार केला नाही. मुळात मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही,’’ असे पवार यांनी सांगितले.
बारामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीसीसीआयच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त पसरले होते. पण हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले होते.
‘‘जर पवार बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना पूर्व विभागाचाही पाठिंबा मिळू शकतो. पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत त्यांनी अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही,’’ असे एमसीएमधील सूत्रांनी सांगितले.