पाकिस्तानने चेन्नईपाठोपाठ कोलकात्याची लढाईजिंकून एकदिवसीय मालिकेवर आपले नाव कोरले. भारताविरुद्धची मालिका म्हणजे आशा-अपेक्षांचे प्रचंड ओझे. पाकिस्तानी संघाने हे दडपण समर्थपणे हाताळून भारतीय भूमीवर मिळविलेल्या या यशाचा आणखी एक शिल्पकार आहे, तो म्हणजे क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मकबूल बाबरी. ईडन गार्डन्सची महत्त्वाची लढत जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कप्तान मिसबाह उल हकने बाबरी यांनाही या विजयाचे श्रेय दिले.
‘‘भारत-पाकिस्तान मालिकेचे मोठे मानसिक दडपण लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मानसोपचारतज्ज्ञ बाबरी यांना संघासोबत धाडले होते. त्यामुळे थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षांचे स्वागत याकडे दुर्लक्ष करीत आम्ही गांभीर्याने सराव केला. विजयासाठी खेळाकडे पूर्णत: कसे लक्ष केंद्रित करावे, याबाबत बाबरी यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले,’’ असे मिसबाहने पाकिस्तानच्या विजयाचे गुपित उलगडले. याचप्रमाणे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी सांगितले की, ‘‘बऱ्याच वर्षांनी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिकेचे दडपण लक्षात घेऊन आम्ही क्रीडा मानसोपचारतज्ज्ञाला संघासोबत पाठविण्याचे ठरविले होते. भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेच्या पाश्र्वभूमीवर नव्या खेळाडूंना बाबरी यांची मदत होईल, अशी आमची अपेक्षा यशस्वी ठरली.’’
स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी पाच वर्षांची बंदी घालण्यात आलेल्या मोहम्मद आमिरशी गेल्याच महिन्यात डॉ. बाबरी यांनी सल्लामसलत केली होती. याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याहून जिवाच्या भीतीने थेट लंडन गाठणारा झुल्करनैन हैदर, वादग्रस्त उमर अकमल आणि अहमद शेहझाद यांनाही डॉ. बाबरी सध्या समुपदेशन करीत आहेत. पाकिस्तानचा संघ जानेवारी महिन्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. या दौऱ्यावरही डॉ. बाबरी हे पाकिस्तानच्या संघासोबत असतील.
भारतीय संघाने २०११मध्ये विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती, तेव्हा मानसोपचारतज्ज्ञ (मेंटल कंडिशनिंग कोच) पॅडी अपटन भारतीय संघासोबत होते. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सराव संपल्यावर याच अपटन महाशयांनी सर्व भारतीय खेळाडूंना बोलावले. तेव्हा हे अपटन खुर्चीवर जाऊन बसले आणि ‘आता सचिन तुम्हाला मार्गदर्शन करील’ असे सांगितले. सचिनच्या शब्दांनी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि संघाने प्रचंड दणपणाचा सामना करीत उपांत्य फेरीचा पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला होता. भारतीय संघाच्या यशामागील हेच मानसिक सूत्र आता पाकिस्तानचा संघही जपत आहे.