बिगरमानांकित प्रणीत कुदळे व अनुभवी खेळाडू गुंजन जाधव यांनी १४ वर्षांखालील गटाच्या आशियाई मानांकन टेनिस स्पर्धेतील मुलांच्या गटात दुसरी फेरी गाठली. ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू आहे. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या कुदळे याने तेजस्वी मेहरा याचे आव्हान ६-१, ६-३ असे संपुष्टात आणले. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. या लढतीच्या तुलनेत जाधव याला शौर्य पिपलानी याच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. त्याने हा सामना ६-१, ५-७, ६-४ असा जिंकला.
तृतीय मानांकित अतिफ शेख यालाही पीयूष सालेकरविरुद्ध विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. त्याने ही लढत ७-६ (७-४), ७-५ अशी जिंकली.
मुलींच्या पहिल्या फेरीत तृतीय मानांकित साई दीपय्या येदुला हिने मान्या विश्वनाथ हिचा ६-२, ६-२ असा दणदणीत पराभव केला. चौथी मानांकित खेळाडू आध्या चेला हिने इशिता पारिख हिला ४-६, ७-५, ६-० असे हरविले. पहिला सेट गमावल्यानंतर तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. श्रेया सागडे हिने लिनेन जमीर हिच्यावर ६-३, ६-१ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली. सातव्या मानांकित प्रकृती भनवानी हिने शरण्या शेट्टी हिचे आव्हान ६-०, ६-३ असे सहज संपुष्टात आणले.