प्रो-कबड्डीच्या लखनऊ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने बंगळुरु बुल्सवर २८-३० अशी मात केली. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या या सामन्यात जयपूरच्या जसवीर सिंहने आपली समयसूचकता दाखवत सामन्याचं पारड जयपूरच्या बाजूने झुकवलं.

जयपूरच्या संघाचा आजच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो जसवीर सिंह. चढाईमध्ये त्याने आपल्या संघाला १० गुणांची कमाई करुन दिली. त्याला कर्णधार मनजीत छिल्लरने ८ तर तुषार पाटीलने ३ गुण मिळवत चांगली साथ दिली. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ हे एकमेकांना चांगली टक्कर देत होते, मात्र अखेरच्या सेकंदांमध्ये जसवीर सिंहने वेळेचं नियोजन करत सामना जयपूरच्या बाजूने झुकवला.

बंगळुरु बुल्सकडून कर्णधार रोहीत कुमारने ११ गुणांची कमाई करत आपल्या संघाचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं होतं. त्याला अजय कुमारने ४ गुण मिळवत चांगली साथ दिली. रविंदर पेहेल, महेंदर सिंह आणि कुलदीप सिंह या बचावफळीनेही बंगळुरुसाठी काही चांगले गुण मिळवले. मात्र अखेरच्या सेकंदांमध्ये जयपूरच्या जसवीरला बाद करण्यात त्यांना अपयश आलं आणि सामना जयपूरच्या नावे झाला.

या पराभवानंतरही बंगळुरुचा संघ ‘ब’ गटात गुणतालिकेत पहिलं स्थान कायम राखलं आहे. मात्र जयपूर पिंक पँथर्स आपल्या आधीच्या सामन्यातील खराब कामगिरीमुळे ‘अ’ गटात शेवटच्या क्रमांकावर राहिलेली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बाचा झुंजार खेळ, पिछाडी भरुन काढत उत्तर प्रदेशवर मात