कारकीर्दीची झोकात सुरुवात केल्यावर गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाज चेतेश्वर पुजाराला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, पण तरीही हे दिवस जातील आणि संघात पुनरागमन करेन, असा विश्वास पुजाराने व्यक्त केला आहे.
पुजाराकडे भारतीय ‘अ’ संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ‘अ’ संघ ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळणार असून पहिला सामना २२ जुलैपासून सुरू होणार आहे.
‘‘भारतीय संघाचा मी एक भाग असलो तरी काही सामन्यांना मला मुकावे लागले, पण काही दिवसांमध्ये मी संघात पुनरागमन करेन. खेळावर मी अथक मेहनत घेत आहे. खेळामध्ये अधिक सुधारणा करून मी पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे,’’ असे पुजारा म्हणाला.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याविषयी पुजारा म्हणाला की, ‘‘ तुम्ही तुमचे अपयश स्वीकारायला हवे, हे मला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यांनी शिकवले. इंग्लंड दौऱ्यातील डावातील अपयशानंतर पुढच्या डावात मी शतक झळकावेन, असे मनाशी पक्के करायचो, पण ते माझ्याकडून घडले नाही. मोठय़ा धावा न होणे हे संतापजनक होते, पण काही काळ गेल्यावर या गोष्टी मी स्वीकारायला शिकलो.’’