जलाल, अंकितची प्रभावी गोलंदाजी
मुंबई-मध्य प्रदेश या ‘ब’ गटातील रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण १६ फलंदाज बाद झाले. मध्य प्रदेशला २४० धावांत रोखल्याचा आनंद मुंबईकरांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. २१ षटकांच्या उर्वरित खेळात मुंबईची ६ बाद ७४ अशी त्रेधातिरपीट उडाली.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मध्य प्रदेशच्या धावसंख्येत हरप्रीत सिंगने सर्वाधिक ५९ धावा केल्या. मुंबईचा ऑफ-स्पिनर अंकुश जैस्वालने पदार्पणात ६३ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्यानंतर मुंबईला जय बिस्ता (२७) आणि अखिल हेरवाडकर (१७) यांनी चांगली सलामी करून दिली. मात्र त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. खेळ थांबला तेव्हा निखिल पाटील १० धावांवर खेळत होता, तर इक्बाल अब्दुल्लाने अद्याप आपले खाते उघडलेले नाही. जलाल सक्सेना आणि अंकित शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश (पहिला डाव) : ७५.१ षटकांत सर्व बाद २४० (हरप्रीत सिंग ५९; अंकुश जैस्वाल ४/६३)
मुंबई (पहिला डाव) : २१ षटकांत ६ बाद ७४ (जय बिस्ता २७; जलाल सक्सेना ३/३२, अंकित शर्मा ३/३९)