सौराष्ट्रविरुद्ध डावाच्या पराभवाच्या छायेत

महाराष्ट्राची फलंदाजी केवळ कागदावरच भक्कम आहे, याचा प्रत्यय सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात पाहायला मिळाला. सौराष्ट्राने केलेल्या ८ बाद ६५७ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या १८२ धावांमध्ये आटोपला. फॉलोऑन मिळाल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात २ बाद ११४ धावा केल्या आहेत.

सौराष्ट्राचे कुशांग पटेल (५/४३) व धर्मेद्रसिंह जडेजा (५/४१) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे महाराष्ट्राच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट उडाली. कर्णधार स्वप्निल गुगळे (३०) व मुर्तुझा ट्रंकवाला (६४) यांचा अपवाद वगळता महाराष्ट्राचा एकही फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळेच २ बाद ९९ धावसंख्येवरून महाराष्ट्राचे उर्वरित आठ गडी ८३ धावांमध्ये बाद झाले. ट्रंकवालाने १३९ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. गुगळेने चार चौकारांसह ३४ धावा केल्या. सौराष्ट्राला पहिल्या डावात ४७५ धावांची आघाडी मिळाली.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावाचीही सुरुवात निराशाजनक झाली. गुगळे केवळ १८ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर ट्रंकवाला व नौशाद शेख यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भर घातली, मात्र जडेजाने शेखला २४ धावांवर बाद करीत महाराष्ट्राला आणखी एक धक्का दिला. ट्रंकवालाने एका बाजूने चिवट खेळ करीत नाबाद ५८ धावा केल्या, त्यामध्ये १० चौकारांचा समावेश होता

महाराष्ट्र अजूनही ३६१ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ फलंदाज शिल्लक आहेत. सामन्याचा रविवारी शेवटचा दिवस असल्यामुळे संपूर्ण दिवस खेळून काढण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या फलंदाजांवर आहे.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र पहिला डाव १७०.५ षटकांत ८ बाद ६५७ घोषित महाराष्ट्र पहिला डाव ५६.२ षटकांत सर्वबाद १८२ (स्वप्निल गुगळे ३४, मुर्तुझा ट्रंकवाला ६४; कुशांग पटेल ५/४३, धर्मेद्रसिंह जडेजा ५/४१) व दुसरा डाव ३७ षटकांत २ बाद ११४ (ट्रंकवाला खेळत आहे ५८, नौशाद शेख २४; शौर्य सनान्दिया १/२०, धर्मेद्रसिंह जडेजा १/१८)

 

अखिल हेरवाडकरचे शतक ; मुंबई ५ बाद २९०

रायपूर : सलामीवीर अखिल हेरवाडकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद २९० अशी मजल मारली आहे. मध्य प्रदेशने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, त्यामुळे मुंबई अजूनही १५५ धावांनी पिछाडीवर आहे.

रणजी सामन्याचा तिसरा दिवस गाजवला तो अखिलने. आपल्या संयमी आणि अभेद्य बचावात्मक फलंदाजीच्या जोरावर अखिलने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. अखिलने १९ चौकारांच्या जोरावर नाबाद १३६ धावांची खेळी साकारली. कर्णधार आदित्य तरे (८०) आणि सूर्यकुमार यादव (४१) यांची अखिलला चांगली साथ मिळाली. सलामीच्या लढतीत तामिळनाडूला नमवल्यानंतर मुंबईने बडोद्याविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३ गुणांची कमाई केली होती.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश (पहिला डाव) : ४४५. मुंबई (पहिला डाव) : १०७ षटकांत ५ बाद २९० (अखिल हेरवाडकर खेळत आहे १३६, आदित्य तरे ८०; ईश्वर पांडे ३/८४).