’मुंबई पहिल्या दिवशी ४ बाद ४०७ ’श्रेयस, रोहितची दिमाखदार शतके
वानखेडे स्टेडियमवरील भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याचे धावांचे कवित्व अद्याप सुरूच आहे. त्यामुळे धावांचे इमले बांधणे फारसे अवघड नव्हते. याच अनुकूलतेच्या बळावर मुंबईने उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद ४०७ धावांपर्यंत झोकात मजल मारली. मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरसाठी तसा हा दुसराच हंगाम, परंतु त्याच्या धावांचे सातत्य कायम असल्याची ग्वाही मर्यादित षटकांच्या क्रिकेटला साजेशा वेगवान शतकाने दिली. तसेच मोहालीच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघात स्थान मिळवू न शकलेल्या रोहित शर्माची बॅटही तेजाने तळपली. त्याने कसोटी क्रिकेटला न्याय देणारे संयमी शतक नोंदवले.
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने २५ ऑक्टोबरला उभारलेल्या भारताविरुद्धच्या ४३८ या विशाल धावसंख्येची जादू अजूनही टिकून आहे, याची प्रचीती शनिवारी पहिल्याच दिवसाने दिली. पहिल्या दिवसाचा नायक श्रेयसने ११० चेंडूंत १४ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने १३७ धावांची दिमाखदार खेळी साकारली. बडोदा आणि पंजाबविरुद्ध अनुक्रमे १७३ आणि २०० धावांची खेळी साकारणाऱ्या श्रेयसने हे हंगामातील तिसरे शतक नोंदवले. कारकीर्दीतील १४वे रणजी शतक साकारणारा रोहित ११० धावांवर खेळत असून, त्याने १२८ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी उभारली. याशिवाय अखिल हेरवाडकर, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि प्रत्येक विकेटसाठी झालेल्या भागीदाऱ्या या मुंबईच्या पथ्यावर पडल्या.
प्रवीण कुमार, भुवनेश्वर कुमार, पीयूष चावला यांसारख्या दिग्गज गोलंदाजांचा असलेल्या उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण मुंबईच्या फलंदाजांना आणि धावांच्या प्रवाहाला उत्तर प्रदेशला रोखता आले नाही. अखिलला ४६ धावांवर असताना पीयूषने स्वत:च्याच गोलंदाजीवर जीवदान दिले. मग त्याने ५८ धावा करताना आदित्य तरे (३०) सोबत ५५ धावांची सलामी दिली, तर श्रेयससोबत दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. भुवनेश्वरने अखिलचा अडसर दूर केल्यानंतर श्रेयसने रोहितसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. भुवीनेच मग श्रेयसच्या खेळीपुढे पूर्णविराम दिला. यष्टीरक्षक एकलव्य द्विवेदीने त्याचा सुरेख झेल टिपला. मग सावधपणे खेळणाऱ्या रोहितने सूर्यकुमारसोबत चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. उत्तर प्रदेशकडून भुवनेश्वरने ५७ धावांत २ बळी मिळवले.

श्रेयसमध्ये वीरू दिसला -रोहित
मुंबई : श्रेयस अय्यरसोबत फलंदाजी करताना मला वीरेंद्र सेहवागच्याच फलंदाजीची झलक पाहायला मिळाली, अशी प्रतिक्रिया भारताचा फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केली.
‘‘प्रतिस्पर्धी संघावर जोरदार आक्रमण चढवले की तो निष्प्रभ होतो, हे क्रिकेटमध्ये अनेकदा पाहायला मिळते. श्रेयसच्या फलंदाजीविषयी मी बरेच ऐकले होते. उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना समोरच्या बाजूने मी त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटला,’’ असे रोहितने सांगितले. उत्तर प्रदेशविरुद्धच्या शतकामुळे आत्मविश्वास दुणावलेला रोहित म्हणाला, ‘‘किती वेगाने अर्धशतक झळकावतो किंवा शतक झळकावतो, यापेक्षा मैदानावर अधिकाधिक तग धरण्याचा निर्धार मी केला होता. बंगळुरूला दुसऱ्या कसोटीसाठी जाईन, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान असेल.’’

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८८ षटकांत ४ बाद ४०७ (श्रेयस अय्यर १३७, रोहित शर्मा खेळत आहे ११०, अखिल हेरवाडकर ५८, सूर्यकुमार यादव ५८; भुवनेश्वर कुमार २/५७). वि. उत्तर प्रदेश.