नऊ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचे वरिष्ठ राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. त्यांनी हा सामना ३-० असा जिंकला. भारतीय अन्न महामंडळाविरुद्धच्या १-१ अशा बरोबरीमुळे मुंबईचेही आव्हान साखळी गटातच संपले.
 या स्पर्धेत उत्तर प्रदेशने उपान्त्य फेरीत स्थान मिळविले. त्यांना आता उपान्त्य फेरीत गंगापूर ओडिशा संघाशी खेळावे लागणार आहे. गंगापूर संघाने कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल (कॅग) संघाला ३-३ असे बरोबरीत ठेवले. स्पर्धेतील अन्य उपान्त्य लढतीत गतविजेत्या एअर इंडियास रेल्वेच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. उपान्त्य सामने रविवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहेत.
महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. त्यांचा हा पहिला गोल १४व्या मिनिटाला दानिश मुजताबा याने केला. उत्तरार्धात सौरवसिंग याने सामन्याच्या ५२व्या व ५३व्या मिनिटाला गोल करीत संघास सहज विजय मिळवून दिला. उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी महाराष्ट्राला हा सामना जिंकणे अनिवार्य होते, मात्र उत्तर प्रदेशच्या अनुभवी खेळाडूंपुढे त्यांचा बचाव निष्प्रभ ठरला.
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) व मुंबई यांच्यातील साखळी सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्या वेळी एफसीआयकडून मुनीष राणा याने गोल केला. मुंबईचा एकमेव गोल अमित गोस्वामीने नोंदविला.