भारताने दिलेल्या ६०० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी परतला आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची अवस्था १५४/५ अशी झालेली आहे. सध्या श्रीलंकेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज अद्यापही खेळपट्टीवर कायम आहे. मॅथ्यूजने भारतीय गोलंदाजीचा चांगला सामना करत आपलं अर्धशतक झळकावलं. तो सध्या ५४ धावांवर नाबाद आहे. त्याआधी सुरुवातीला ३ गडी माघारी परतल्यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि उपुल तरंगा या जोडीने श्रीलंकेची धावसंख्या शंभरीपार नेली. उपुल तरंगाने भारतीय गोलंदाजीचा चांगला सामना करत, आपलं अर्धशतक झळकावलं. त्याला दूसऱ्या बाजूनं अँजलो मॅथ्यूजनेही चांगली साथ दिली. तरंगाने आपल्या अर्धशतकी खेळीत आतापर्यंत १० चौकार लगावले आहेत. मॅथ्यूज आणि तरंगाने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. आजच्या दिवस ही जोडी श्रीलंकेची आणखी पडझड थांबवणार असं वाटत असतानाच, अभिनव मुकुंदच्या चपळाईमुळे तरंगा धावबाद होऊन माघारी परतला, त्याने ६४ धावांची खेळी. पाठोपाठ रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर अभिनव मुकुंदने डिकवेलाचा सुरेख झेल घेत लंकेला पाचवा धक्का दिला.

त्याआधी मोहम्मद शमी आणि उमेश यादवने दिलेल्या दणक्यामुळे पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा डाव गडगडला . १०० धावांच्या आतच लंकेचे ३ फलंदाज माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. ६०० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. दिमुथ करुणरत्नेला स्वस्तात माघारी धाडण्यात उमेश यादवला यश आलं आहे. त्यानंतर उपुल तरंगा आणि धनुष्का गुणतलिकाने लंकेचा डाव काहीसा सावरला. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ६१ नावांची अर्धशतकी भागीदारी केली. मात्र यानंतर मोहम्मद शमीने गुणतिलका आणि मेंडीसला माघारी धाडत श्रीलंकेची अवस्था बिकट केली. भारताकडून मोहम्मद शमीने २ तर उमेश यादव आणि अश्विनने १-१ बळी घेतला.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद ६०० धावा केल्या. कसोटीत पदार्पण केलेल्या हार्दिक पांड्याने तळातल्या फलंदाजांना हाताशी घेत आपलं अर्धशतक साजरं केलं. त्यामुळे भारताला ही मोठी धावसंख्या गाठता आली आहे. पांड्याने ४९ चेंडुंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ५० धावांची खेळी केली. अखेर लहीरु कुमारने त्याला झेलबाद करत भारताचा डाव संपवला.

सकाळच्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झटपट माघारी धाडण्यात श्रीलंकेचे गोलंदाज यशस्वी झाले होते. दरम्यान अजिंक्य रहाणेने आज सकाळी आपलं अर्धशतक साजरं केलं, मात्र लहीरु कुमाराच्या गोलंदाजीवर तो करुणरत्नेकडे झेल देत माघारी परतला. त्याआधी नुवान प्रदीपने चेतेश्वर पुजाराला डिकवेलाकडे झेल द्यायला भाग पाडलं. मात्र त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि वृद्धीमान साहा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाने ५५० धावांचा टप्पा ओलांडला . ही जोडी जमलेली असतानाच श्रीलंकेचा कर्णधार रंगना हेरथने वृद्धीमान साहाला बाद करत भारताला आणखी एक धक्का दिला. यानंतर पाठोपाठ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या अश्विनला नुवान प्रदीपने यष्टीरक्षक डिकवेलाकडे झेल देत माघारी धाडलं.

यानंतर अनपेक्षितरित्या हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने नवव्या विकेटसाठी ६२ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. महत्वाचं म्हणजे पांड्या आणि शमीने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्लाबोल करत अनेक उत्तुंग षटकार खेचले.  मात्र त्यानंतर लहीरु कुमारच्या गोलंदाजीवर असाच उंच फटका खेळण्याच्या नादात शमी झेलबाद झाला आणि भारताला नववा धक्का बसला.

श्रीलंकेच्या नुवान प्रदीपने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली. भारताच्या ६ फलंदाजांना त्याने माघारी धाडलं. त्याला लहीरु कुमारने ३ आणि कर्णधार रंगना हेरथने १ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र श्रीलंकेच्या इतर गोलंदाजांची प्रदीपला फारशी चांगली साथ न मिळू शकल्याने पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांवर आपला वरचष्मा गाजवलेला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी दिलेलं डोंगराएवढ्या धावसंख्येचं आव्हान श्रीलंकेचे फलंदाज कसे काय पेलतायत, हे पहावं लागणार आहे.

  • दुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची अवस्था १५४/५
  • मॅथ्यूजने श्रीलंकेची पुढची पडझड थांबवली, भारतीय आक्रमणाचा धीराने सामना
  • अश्विनच्या गोलंदाजीवर अभिनव मुकुंदकडे झेल देत डिकवेला माघारी, लंकेचे ५ गडी माघारी
  • अभिनव मुकंदच्या चपळाईने उपुल तरंगा धावबाद, श्रीलंकेला चौथा धक्का
  • तरंगा आणि मॅथ्यूजमध्ये ५७ धावांची भागीदारी केली
  • तरंगा आणि मॅथ्यूज जोडीने श्रीलंकेचा डाव सावरला, श्रीलंकेची धावसंख्या शंभरीपार, तरंगाचं अर्धशतक
  • मोहम्मद शमीचे श्रीलंकेला दणके, गुणतिलके आणि मेंडीसला धाडलं माघारी, लंकेचे ३ गडी माघारी
  • तरंगा आणि गुणतलिकाने लंकेचा डाव सावरला, चहापानापर्यंत श्रीलंका ३८/१
  • ६०० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची अडखळती सुरुवात, दिमुथ करुणरत्ने माघारी
  • लहीररु कुमारने पांड्याला झेलबाद करत भारताचा डाव संपवला, पहिल्या डावात भारतीय संघ सर्वबाद ६००
  • हार्दिक पांड्याचं कसोटी पदार्पणातच अर्धशत, ४९ चेंडुत ५० धावांची खेळी
  • मात्र लहीरु कुमाराने शमीला बाद करत भारताची जोडी पुन्हा फोडली, दोघांमध्ये नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • शमी आणि पांड्यामध्ये एकामागोमाग एक उत्तुंग षटकार खेचण्याची स्पर्धा
  • मात्र यानंतर शमी आणि पांड्याचा श्रीलंकन गोलंदाजांवर हल्लाबोल
  • जाडेजाचा त्रिफळा उडवत नुवान प्रदीपने भारताला आठवा धक्का दिला
  • लंच टाईमनंतर जाडेजा, पांड्याची फटकेबाजी
  • पहिल्या सत्रापर्यंत भारताची धावसंख्या ५०३/७
  • नुवान प्रदीपचा पहिल्या डावात टिच्चून मारा, पहिल्या डावात आतापर्यंत भारताच्या ५ फलंदाजांना धाडलं माघारी
  • पाठोपाठ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला रविचंद्रन अश्विनही माघारी
  • साहाला बाद करत रंगना हेरथने भारताची जमलेली जोडी फोडली
  • रविचंद्रन अश्विन आणि वृद्धीमान सहाची सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी
  • सकाळच्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांचं पुनरागमन, अजिंक्य रहाणेलाही माघारी धाडण्यात लंकेचे गोलंदाज यशस्वी
  • नुवान प्रदीपचा भारताला चौथा धक्का, चेतेश्वर पुजारा तंबूत परत
  • अजिंक्य रहाणेची पुजाराला भक्कम साथ, रहाणेचं झुंजार अर्धशतक
  • भारताची धावसंख्या ४०० पार, पुजारा-रहाणेमध्ये शतकी भागीदारी
  • ३९९/३ या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात