टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजयला शिवी दिल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने माफीनामा सादर केला आहे. भावनांवर आवर घालता न आल्याने अपशब्द निघाला, त्याबद्दल माफी मागतो, असे स्मिथने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जोश हेझलवूडचा झेल मुरली विजयने घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू सेलिब्रेशन करत पॅव्हेलियनकडे निघाले. मात्र रिव्ह्यूमध्ये हेजलवूडचा झेल व्यवस्थित टिपला गेला नसल्याचे स्पष्ट झाले आणि पंचांनी हेझलवूडला बाद देण्यास नकार दिला.

पंचांच्या निर्णयानंतर भारतीय खेळाडूंना परत बोलावण्यात आले तेव्हा मुरली विजय मैदानाकडे धावत येत असताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या स्टीव्ह स्मिथने मुरली विजयला शिवी दिली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.
स्मिथने मुरली विजयला शिवी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडिया आणि क्रिकेट विश्वात टीका सुरू झाली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील स्मिथला याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने आपली चूक कबुल करून झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. तो म्हणाला की, संपूर्ण मालिका अतिशय चुरशीची होती. मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही त्यामुळे अपशब्द निघाले. त्याबद्दल मी माफी मागतो.

 

दरम्यान, स्टीव्ह स्मिथ या मालिकेत चांगलाच फॉर्मात होता. संपूर्ण मालिकेत त्याने ४९९ धावा ठोकल्या. यात तीन शतकांचा सामावेश आहे. पण धरमशाला कसोटीत तो संघासाठी विजयश्री मिळवून देण्यात अपयशी ठरला. २७ वर्षीय स्मिथने ही मालिका त्याच्या करिअरमधील आजवरची सर्वोत्कृष्ट मालिका असल्याचेही म्हटले. भारतीय परिस्थितीत आम्ही दिलेली कडवी झुंज लक्षात घेता ही मालिका माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट होती. आव्हानांना सामोरे जात आम्ही चांगले प्रत्युत्तर दिले, असे स्मिथ म्हणाला.

भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळविण्यात आलेले हे चारही कसोटी सामने खेळाडूंमधील वादामुळे चांगलेच चर्चेत राहिले. रांची कसोटीतील कोहली-स्मिथच्या वादानंतर धरमशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. दोघांमधील तणाव वाढला होता. अखेर पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले होते.