तज्जूल इस्लामच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर थरारक पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशने झिम्बाब्वेवर तीन विकेट्सने विजय मिळवला. गोलंदाजीमध्ये दुसऱ्या डावात इस्लामने बांगलादेशकडून आतापर्यंत सर्वाधिक आठ विकेट्स पटकावण्याची किमया साधली. आठ विकेट्ससह इस्लामने झिम्बाब्वेचे कंबरडे मोडत त्यांचा ११४ धावांत खुर्दा उडवला. बांगलादेशला विजयासाठी १०१ धावांची गरज असताना त्यांची ३ बाद ० अशी दयनीय सुरुवात झाली. पण महमदुल्लाह (२८), मुफिकर रहिम (नाबाद २३) यांनी संघाला सावरले. पण ७ बाद ८२ अशी अवस्था असताना इस्लाम फलंदाजीला आला आणि त्याने २ चौकारांसह नाबाद १५ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इस्लामनेच सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या विजयासह बांगलादेशने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.