सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. ज्याप्रमाणे या मंचाचा फायदा घेणारी लोकं आहेत, त्याचप्रकारे अनेकजण सोशल मीडियाचा गैरवापर करताना दिसतात. यात सेलिब्रेटी आणि त्यांच्या मुलांची बोगस अकाऊंट तयार करुन त्यांच्या नावे चुकीचे संदेश पसरवण्याचे अनेक प्रकार आपण आतापर्यंत बघितले आहेत. असाच काहीसा प्रकार सचिन तेंडुलकरच्या मुलांबाबत घडला आहे. अर्जुन आणि सारा तेंडुलकर या नावाने ट्विटरवर बोगस अकाऊंट तयार करण्यात आली होती. ही बाब सचिनच्या लक्षात येताच, त्याने ट्विटरवर यावरुन तक्रार नोंदवत यावर कारवाई करण्याची विनंती केली. सचिनच्या या तक्रारीनंतर अर्जुन आणि साराची ट्विटरवरील बोगस अकाऊंट ट्विटरने हटवली आहेत.

सोमवारी सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या मुलांच्या बोगस अकाऊंटबद्दल तक्रार केली. माझी दोन्ही मुलं ट्विटरवर नाहीयेत, त्यामुळे अशा बोगस अकाऊंटचा आपल्याला त्रास होत असल्याचं सांगत सचिनने ट्विटरला या बोगस अकाऊंटवर कारवाई करण्याची विनंती केली.

सचिनसारख्या सेलिब्रेटीने तक्रार केल्यानंतर ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पावलं उचलत, मंगळवारी दुपारपर्यंत सचिनच्या दोन्ही मुलांची बोगस अकाऊंट ट्विटरवरुन हटवली. याआधीही २०१४ साली सचिनचं ट्विटरवर बोगस अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. या अकाऊंटवरुन काही राजकीय व्यक्तींवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ट्विटरने सचिनचं बोगस अकाऊंट तात्काळ हटवलं होतं.