मेस्सीने अर्जेटिनाला तारले

पॉवलिन्होच्या तीन गोलांमुळेच ब्राझीलने उरुग्वेचा ४-१ असा दारुण पराभव करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली. अन्य लढतीत लिओनेल मेस्सीने केलेल्या एकमेव गोलामुळेच अर्जेटिनाला चिलीविरुद्ध १-० असा विजय मिळवता आला.

मूळचा चीनचा रहिवासी असलेल्या पॉवलिन्हो याने केलेले तीन गोल हेच ब्राझीलच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. त्यामुळेच पाच वेळा विश्वविजेता असलेल्या ब्राझीलचे आव्हान राहिले आहे. अव्वल साखळी गटात ब्राझीलने आघाडीस्थान राखले आहे. या गटातील पहिले पाच संघ रशियात पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या गटातील पाच फे ऱ्या बाकी आहेत.

उरुग्वेचा खेळाडू एडिन्सन कावानीला ब्राझीलचा गोलरक्षक अ‍ॅलिसनने धक्का देऊन पाडले. त्यामुळे नवव्या मिनिटाला त्यांना पेनल्टी किकची संधी लाभली. त्याचा फायदा घेत कावानीने गोल मारून संघास आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १० मिनिटांनी पॉवलिन्होने २५ यार्ड्स अंतरावरून सुरेख फटका मारला व १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या ५१व्या मिनिटाला फिलीप कुटिन्होने ब्राझीलचा दुसरा गोल नोंदवत संघास आघाडी मिळवून दिली. अव्वल दर्जाचा खेळाडू नेमार याने ७५व्या मिनिटाला ब्राझीलचा तिसरा गोल नोंदवला. सामन्याच्या शेवटच्या अतिरिक्त वेळेत पॉवलिन्हो याने आणखी दोन गोलांची भर घातली.

ब्यूनस आयर्स येथे झालेल्या लढतीत अर्जेटिनाला चिलीविरुद्ध विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. मुख्य फेरीसाठी आव्हान टिकवण्याकरिता चिली संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. त्या दृष्टीने त्यांनी सर्व शक्ती पणाला लावून खेळ केला; परंतु अर्जेटिनाचा हुकमी खेळाडू मेस्सीने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने १६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा घेत गोल नोंदवला.

चिलीचा बचावरक्षक होजे फ्युएन्झालिदाने अर्जेटिनाच्या अँजेल डी मारियाला धक्का दिल्यामुळे ही पेनल्टी किक देण्यात आली होती. या सामन्यातील विजयामुळे साखळी गटात अर्जेटिना तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.