भारत-इंग्लंड यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आक्रमक फलंदाजांचा समावेश असल्यामुळे पुण्यातील क्रिकेट चाहत्यांना पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात चौकार व षटकारांच्या आतषबाजीचीच अपेक्षा आहे. रविवारी सुट्टीचा आनंद क्रिकेटद्वारे घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या चाहत्यांना भारतीय संघ कसोटी मालिकेतील विजयी मालिका पुढे सुरू ठेवेल अशी खात्री आहे.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ३७ हजार प्रेक्षकक्षमतेचे असून तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच सर्व तिकिटे विकली गेली होती. हे लक्षात घेता रविवारचा हा सामना ‘हाऊसफुल्ल’ राहणार आहे. कसोटी मालिकेतील निर्विवाद विजयानंतर वाढलेला आत्मविश्वास, अनुकूल वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा घेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची बाजू वरचढ राहील अशी अपेक्षा आहे. अर्थात, इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली उतरलेला इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे.

एकदिवसीय सामन्यासाठी अनुकूल अशीच खेळपट्टी तयार करण्यात आली आहे, तसेच हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे दवबिंदूचा सुरुवातीला त्रास होण्याची शक्यता नाही. साहजिकच प्रथम फलंदाजी करणारा संघ तीनशे धावांपलीकडे मजल गाठू शकेल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने भारताची मदार प्रामुख्याने कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी व संघात पुनरागमन करणारा युवराज सिंग यांच्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात रहाणेने शानदार खेळ करीत आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. इंग्लंडचे फलंदाज फिरकी गोलंदाजीपुढे चाचपडत खेळतात हे लक्षात घेऊनच युवराजला पुन्हा पाचारण करण्यात आले आहे. धडाकेबाज फलंदाज व उपयुक्त फिरकी गोलंदाज अशा दोन्ही भूमिका त्याला पार पाडाव्या लागणार आहेत. धोनीवर नेतृत्वाची जबाबदारी नसल्यामुळे तो मुक्तपणे फलंदाजी करू शकेल. गोलंदाजीची बाजू रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांप्रमाणेच केदार जाधव या कामचलाऊ गोलंदाजावरही आहे.

सराव सामन्यात सॅम बिलिंग्ज व जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या तडाखेबाज खेळामुळे इंग्लंडचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना कर्णधार मॉर्गन, जो रूट, मोईन अली, जोस बटलर व बेन स्टोक्स यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

महेंद्रसिंग धोनी हा माझ्यासोबत संघात असल्यामुळे मला मोठा मानसिक आधार आहे. त्याच्या बहुमोल सल्ल्याचा खूप उपयोग मला होणार आहे. अर्थात, सरतेशेवटी अंतिम निर्णय मलाच घ्यावयाचे आहेत. कसोटी मालिकेतील निर्विवाद यश मिळवल्यानंतर माझ्यावर येथे कोणतेही दडपण नाही. एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी उत्सुक आहे. युवराज सिंगच्या समावेशामुळे आमचा संघ आणखी समतोल झाला आहे.  विराट कोहली, भारताचा कर्णधार

कसोटी मालिकेतील पराभव इतिहासजमा झाला आहे. आम्ही सकारात्मक वृत्तीनेच एकदिवसीय मालिकेत खेळणार आहोत. सराव सामन्यातील समाधानकारक कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज हे आमच्यासाठी आव्हान असले तरी त्याचे कोणतेही दडपण आमच्यावर नाही. फिरकी गोलंदाजीविरुद्ध आक्रमक खेळ करण्याची क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये आहे, हेच आम्ही दाखवण्यासाठी मानसिकदृष्टय़ा तयार झालो आहोत.  ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

संघ –

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.
  • इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस व्होक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, लिआम प्लंकेट, लिआम डॉसन.
  • सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.