कसोटी करिअरमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा पाकिस्तानचा पहिला कसोटीवीर युनूस खान याने आगामी काळात भारताचा युवा क्रिकेटपटू विराट कोहली क्रिकेट विश्वात सचिनचा विक्रम देखील मोडीत काढेल असे भाकीत केले. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून खेळताना अर्धशतकी खेळी साकारून कसोटी करिअरमधील दहा हजार धावांचा टप्पा युनूस खानने ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो जगातला १३ वा फलंदाज ठरला आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी युनूस खानने हे यश प्राप्त केले.
”दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी तुमचे मन ठाम असायला हवे. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीचा विचार जर आपण केला तर तो नक्कीच एक लक्ष्य समोर ठेवून खेळणारा खेळाडू आहे. विराट सचिनलाही मागे टाकेल याचा विश्वास मला आहे.”, असे युनूस म्हणाला.

 

पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा ठोकण्याचा पराक्रम कोणत्याही फलंदाजाला करता आला नव्हता. युनूस खानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सबिना पार्क स्टेडियमवर सुरू असेलल्या कसोटीत पाकिस्तानकडून या पराक्रमाची नोंद केली. युनूस खानने सामन्याच्या ४९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून कसोटी विश्वात दहा हजार धावांचा टप्पा गाठला. युनूस खान यांच्यापाठोपाठ माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांचा नंबर लागतो. मियाँदाद यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८,८३२ धावांची नोंद आहे.