पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा विश्वनाथन आनंद या भारतीय खेळाडूने बिलबाओ चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. त्याने पहिल्या लढतीत युक्रेनच्या रुझलान पोनोमारियेव्ह याला पराभूत केले.
आनंद याला नोव्हेंबरमध्ये मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध विश्वविजेतेपदाची लढत खेळावी लागणार आहे. या स्पर्धेपूर्वी त्याची ही शेवटची स्पर्धा असणार आहे. त्याने रुझलानविरुद्ध सहजसुंदर खेळ केला. त्याने प्रत्येक आघाडीवर रुझलानला निष्प्रभ केले. स्पर्धेतील अन्य लढतीत लिवॉन आरोनियन (अर्मेनिया) व फ्रान्सिस्को व्हॅलेजो पोन्स (स्पेन) यांनी ४६ व्या चालीस बरोबरी स्वीकारली. ही स्पर्धा चार खेळाडूंमध्ये दुहेरी लीग पद्धतीने होत आहे. डाव जिंकणाऱ्या खेळाडूस तीन गुण मिळतात तर डाव बरोबरीत ठेवल्यानंतर एक गुण मिळतो. आनंदने तीन गुणांसह आघाडी घेतली आहे. आरोनियन व पोन्स यांचे प्रत्येकी एक गुण आहे.
आनंद याने पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळताना किंग्ज इंडियन डिफेन्स तंत्राचा उपयोग केला. त्याने केलेल्या आक्रमक चालींपुढे रुझलानचा बचाव निष्प्रभ ठरला. १९ व्या चालीस आनंदने कॅसलिंग केले. रुझलान याने एका प्यादाचा बळी देत आनंदला झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने हा डाव ६१ चालींपर्यंत नेला. मात्र त्यापूर्वीच आनंदचा विजय निश्चित झाला होता. ६१ व्या चालीस रुझलान याने पराभव मान्य केला.