विश्वचषक स्पध्रेतील पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर टीकाकारांनी आणि माजी कसोटीपटूंनी संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांच्यावर शाब्दिक अस्त्रांचा भडिमार केला. टीकाकारांनी वकार यांची प्रतिमा घमंडी आणि सूडबुद्धीने ग्रासलेले अशी प्रदर्शित केली होती, परंतु वकार यांनी आपण देशाभिमानी असल्याचे सांगून टीकाकारांवरच हल्लाबोल केला.
खेळाडूंशी आपली वागणूक उद्धटपणाची होती का, या प्रश्नावर एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वकार म्हणाले, ‘‘खेळाडूंसोबत मी कधीच उद्धटपणाने वागलो नाही. उलट त्यांच्याशी मी मैत्रीपूर्ण संबध ठेवले होते. मात्र, सराव सत्रात मला कोणतीही तडजोड आवडत नाही आणि कारण तडजोड केल्यास पाकिस्तान क्रिकेट कधीच प्रगती करू शकत नाही.’’
संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचेही वकार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘ज्या खेळाडूंसोबत आपण खेळलो, पुढे त्यांचाच प्रशिक्षक असणे कठीण असते. त्यामुळे प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना संघात असे वरिष्ठ  खेळाडू असायला नको, परंतु कोणाचीही कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न मी केलेला नाही. कामगिरीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना संघातून वगळले, इतकेच मी केले.’’