भर पावसात निसरडय़ा रस्त्यांवरून गाडी चालवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातातून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोच बचावला आहे. मात्र त्याच्या डोक्याला दुखापत झाली.
आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून प्रवास करत असताना थ्री-डब्ल्यूएस ओव्हल क्रिकेट स्टेडियमजवळ केमार रोचच्या कारला अपघात झाला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताच्या काही तासानंतर केमार रोचने ‘ट्विटर’द्वारे अपघाताचे कारण जाहीर केले. ‘‘दुखापतीतून आपण सावरत असून माझी प्रकृती उत्तम आहे. कुटुंबिय, चाहते आणि माझ्या मित्रांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद!’’ असे रोचने म्हटले आहे. त्याने २३ कसोटी आणि ६१ एकदिवसीय सामन्यांत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे तो जवळपास १२ महिन्यांपासून वेस्ट इंडिज संघातर्फे एकही सामना खेळू शकलेला नाही.