स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या पंकज अडवाणीने कारकिर्दीत वेळेआधारित जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
जागतिक स्तरावर अद्भुत कामगिरीने ‘गोल्डन बॉय’ अशी बिरुदावली पटकावणाऱ्या पंकजने अंतिम लढतीत इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलवर १९२८-८९३ अशी मात केली. गेल्या आठवडय़ातच पंकजने पीटर गिलख्रिस्टला नमवत गुणआधारित प्रकारात जेतेपदाची कमाई केली होती.
या प्रकारातले पंकजचे हे बारावे विश्वविजेतेपद आहे, तर वेळ तसेच गुण प्रकारात असे दुहेरी जेतेपद पटकावण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव बिलियर्ड्सपटू ठरला आहे. पंकजने माइक रसेलचा विक्रम मोडला. रसेलने २०१० आणि २०११ मध्ये दोन्ही प्रकारांत जेतेपदांवर नाव कोरले होते. पंकजने यापूर्वी २००५ मध्ये माल्टा येथे तर २००८ बंगळुरू येथे दोन्ही प्रकारांत जेतेपदाला गवसणी घातली होती.
हॉलने उपान्त्य फेरीत भारताच्याच भालचंद्र भास्करवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम लढतीत पंकजच्या झंझावाती खेळापुढे तो निष्प्रभ ठरला. अंतिम लढतीसाठी सर्वोत्तम प्रदर्शन राखून ठेवणाऱ्या पंकजने ७४६-४८५ अशी आघाडी घेतली. १८५चा ब्रेक करत पंकजने ही आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर ९४, १८२, २८९ आणि १४५ असे ब्रेक करत त्याने दोन तासांतच हजार गुणांचा आकडा गाठला. त्यानंतर आघाडी वाढवत त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘‘२६० गुणांची आघाडी घेतल्यामुळे पहिल्या सत्रातच सामना नियंत्रणात होता.
मात्र हॉल पुनरागमन करू शकतो याची  मला जाणीव होती. त्यामुळे पुढच्या ब्रेकच्या वेळी जास्तीतजास्त गुण पटकावण्याची मी काळजी घेतली. माझा भाऊ श्री ऑनलाइन हा सामना पाहत होता. त्याच्या काही सूचनांचाही उपयोग झाला,’’ असे पंकजने सांगितले.
या क्षणी काय बोलावे मला सुचत नाही. दोन्ही प्रकारांत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणे हे शब्दबद्ध करता येणार नाही. मी माझ्या खेळावर आणि शारीरिक तसेच मानसिक कणखरतेवर प्रचंड मेहनत घेतली होती. ही मेहनत फळाला आली. बिलियर्ड्सकडून मी आता स्नूकरकडे वळणार आहे. पुढील महिन्यात बंगळुरू येथे होणाऱ्या जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करण्यासाठी मी शेफील्ड येथे रवाना होणार आहे.
पंकज अडवाणी, विश्वविजेता बिलियर्ड्सप