वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत भारताचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. उपांत्यपुर्व सामन्यात मलेशियाने भारतावर ३-२ अशी धक्कादायक मात केली आहे. रमणदीप सिंहचा अपवाद वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूंना या सामन्यात चमक दाखवता आली नाही. पहिल्या सत्रात गोलपोस्टवरील कोंडी फोडण्यात दोन्ही संघांना अपयश आलं. तरीही मलेशियाने केलेला खेळ भारताच्या तुलनेत सरस होता. पहिल्या सत्रात मलेशियाला दोन पेनल्टी कॉर्नरही मिळाले होते. मात्र भारतीय गोलरक्षक विकास दहीयाने चांगला बचाव करत मलेशियाचे मनसुबे उधळून लावले.

अखेर दुसऱ्या सत्रात १९ व्या मिनीटाला मलेशियाच्या रहीमने ही कोंडी फोडलीच. पेनल्टी कॉर्नवर गोल झळकावत त्याने भारताला पहिला धक्का दिला. पाठोपाठ २० व्या मिनीटाला तजुद्दीन तेंगकुने पेनल्टी कॉर्नवर गोल झळकावत मलेशियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. नुकत्याच पार पडलेल्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत मलेशियाने भारतावर १-० अशी मात केली होती. त्यामुळे या सामन्यातही मलेशियाचे खेळाडू भारताला धक्का देणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र मध्यांतरानंतरच्या सत्रात ३१ व्या मिनीटाला भारताच्या रमणदीपसिंहने सुरेख मैदानी गोल झळकावत हे अंतर २-१ असं कमी केलं. हरमनप्रीतच्या पासवर डी-एरियाता आलेला बॉल रमणदीपने मोठ्या शिताफीने गोलपोस्टमध्ये ढकलला. पाठोपाठ अवघ्या काही मिनीटात पेनल्टी कॉर्नवर रमणदीपने दुसरा गोल करत सामन्यात भारताला बरोबरी साधून दिली.

तिसऱ्या सेटमध्ये परत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करत सामन्यावर पकड घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या सत्रात भारतीय संघाला दोन पेनल्टी कॉर्नरही मिळाले, मात्र त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताचे खेळाडू कमी पडले. दुसरीकडे मलेशियन खेळाडूंनीही काही चांगल्या चाली रचत भारताच्या बचावफळीवर आक्रमण केलं. मात्र त्यांनाही गोल करण्यात अपयशच आलं.

मात्र चौथ्या सत्रात मलेशियाने ही कोंडी पुन्हा एकदा फोडली. रहीमने गोलरक्षक विकास दहीयाच्या उजव्या बाजूवर आक्रमण करत बॉल गोलपोस्टमध्ये धाडला. याआधी पंचानी दिलेल्या पेनल्टी कॉर्नरच्या निर्णयाविरोधात भारतीय संघाने अपील केलं होतं, मात्र तिसऱ्या पंचांनी ते फेटाळून लावलं. मलेशियाने केलेल्या तिसऱ्या गोलनंतर भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी खेळाची गती वाढवत मलेशियाच्या गोलपोस्टवर हल्ला करायला सुरुवात केली. मात्र खेळाडूंमधल्या ताळमेळाच्या अभावाने गोल करण्यात कोणालाही यश आलं नाही.

पिछाडीवर पडल्यामुळे अखेरच्या काही मिनीटात भारतीय खेळाडूंच्या देहबोलीत तणाव दिसायला लागला. त्यातच शेवटच्या अडीच मिनीटांमध्ये भारताने मलेशियाला पेनल्टी कॉर्नर बहाल करत आपल्या पायावर धोंडा मारुन घेतला. मोक्याच्या क्षणी आपली शस्त्र टाकण्याच्या जुन्या सवयीने भारतीय संघाचा पुन्हा एकदा घात केला. प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांचा संतापलेला चेहरा हीच गोष्ट अधोरेखीत करत होता.

अखेरच्या एक मिनीटात भारताकडून दोन गोल करणाऱ्या रमणदीप सिंहने मैदानी गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अगदी काही इंचाच्या फरकाने बॉल गोलपोस्टच्या बाहेर गेला. उर्वरित वेळ मलेशियाच्या खेळाडूंनी बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवत उपांत्य फेरीतलं आपलं तिकीट पक्क केलं. सुलतान अझलन शहानंतर मलेशियाने भारताचा सलग दुसरा पराभव केला आहे. उपांत्य फेरीत मलेशियाचा सामना रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनासोबत होणार आहे.