क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री-मॉडेल हेजल किच यांच्या विवाह सोहळ्यात अनेक चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटू उपस्थित होते. यावेळी युवराज सिंहने अनेकांसोबत बिनधास्त डान्स केला. हेजल किच, विराट कोहली यांच्यासह अनेकांसोबत युवराज सिंग थिरकताना दिसला. आता युवराजच्या लग्न सोहळ्यातील आणखी एक व्हिडीओ पाहायला मिळतो आहे. युवराज सिंगच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये युवराज सिंग, रणविजय सिंग आणि हार्दिक पंड्या पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने युवराजने त्याच्यासोबत स्पेशल स्टेप्स केल्या. त्यांचा हा अतरंगी डान्स आतापर्यंत हजारो ट्विटर युजर्सनी पाहिला आहे.

युवराजच्या लग्नाचे रिसेप्शन नोएडामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी हार्दिक पटेल आणि युवराज सिंह पंजाबी गाण्यावर थिरकले. हार्दिक पंड्याचा हात फ्रॅक्चर असल्याने तो एकाच हाताचा वापर करुन नाचण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या या संघ सहकाऱयाला युवराजने मस्त कंपनी दिली. हार्दिकसोबत डान्स करण्यासाठी युवराजने आपला डावा हात खिशाला घातला आणि फक्त उजव्या हाताचा वापर करत स्टेप्स करण्यास सुरुवात केली. हार्दिक आणि युवराजच्या या अतरंगी स्टेप्स पाहून मग रणविजय सिंगनेदेखील तशाच प्रकारे नाचण्यास सुरुवात केली.

नोएडामधील रिसेप्शनमध्ये युवराज निळ्या रंगाचा शर्ट आणि करड्या रंगाची पॅन्ट घालून स्टेजवर दाखल झाला. या समारंभात युवा खेळाडू हार्दिक पंड्या लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. पंड्याने फ्रॅक्चर झालेला त्याचा हात लाल रंगाच्या कापडानेच गळ्यात अडकवला होता. त्यामुळे एका हाताने डान्स करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय पंड्यासमोर नव्हता. मात्र यातही युवराजने अतरंगी स्टेप्स करत पंड्याला साथ दिली.

युवराज सिंग बुधवारी चंदीगढमधील गुरुद्वाऱ्यात शीख पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यानंतर शुक्रवारी गोव्यात हिंदू प्रथा परंपरेनुसार त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित होते. युवराज सिंग आणि हेजल कॅथलिक पद्धतीनेदेखील विवाह बंधनात अडकले. यावेळी हेजलमधील कोणती गोष्ट सर्वाधिक आवडते, असा प्रश्न युवीला विचारण्यात आला. या प्रश्नाला ‘हेजल अतिशय साधी आहे. माझ्या आईमध्ये असणारे अनेक गुण मी तिच्यामध्ये पाहिले आहेत. ती खूप कौटुंबिक आहे. तिने कुटुंबाला अतिशय घट्टपणे धरुन ठेवले आहे. त्यामुळे ती खूप स्पेशल आहे,’ असे उत्तर देत युवीने थेट षटकार ठोकला.