23 September 2017

News Flash

शौचालय..?  ऑक्युपाय!!

एका दिवसभराच्या सार्वजनिक कार्यक्रमास आम्ही गेलो होतो.

आश्लेषा महाजन | Updated: September 10, 2017 2:01 AM

एका दिवसभराच्या सार्वजनिक कार्यक्रमास आम्ही गेलो होतो. ‘स्त्रियांवरील अन्याय’ या विषयावर परिसंवाद होता. छानसे व्यासपीठ, माईक, पंखे आणि खुर्च्या असलेले ते सभागृह होते. स्त्रियांविषयीच्या त्या कार्यक्रमाला स्त्रिया बहुसंख्येने आणि संयोजकांसह काही मोजके पुरुषही होते. काही तास उलटल्यावर माझ्या मैत्रिणीची चुळबूळ सुरू झाली. मी ओळखले, तिला शौचालयात जायचे होते. वास्तविक मलाही जायचे होते. आम्ही सभोवार पाहिले. एका कर्मचारी स्त्रीकडे चौकशी केली तेव्हा कळले की संयोजकांनी तिथे शौचालयाची सोय केलेली नाही. म्हणजे तिथे एक शौचालय होते-ते फक्त पाहुण्यांसाठी, दुसरे होते त्यावर पाटी होती- ‘पुरुषांसाठी.’ पलीकडे ‘स्त्रियांसाठी’ असे लिहिलेल्या शौचालयाला मात्र कुलूप!

अधिक चौकशी केली तेव्हा कळले की स्त्रियांचे शौचालय खराब झाले आहे आणि ते साफ करणारा कर्मचारी आजारी पडलाय म्हणून ते बंद ठेवण्यात आले आहे. कारण काहीही असो, बहुसंख्येने तिथे कार्यक्रमासाठी आलेल्या स्त्रियांनी मग जायचे कुठे? मलमूत्र विसर्जन ही नैसर्गिक बाब आहे. एखादा कार्यक्रम ठरवताना ही अतिशय महत्त्वाची बाब कशी काय दुर्लक्षिली जाते? शेवटी आम्ही पाहुण्यांसाठी असणाऱ्या ‘शाही’ शौचालयात जबरदस्तीने घुसलो. ही गोष्ट तिथल्या एका अधिकाऱ्याला समजली. त्यांनी आम्हाला शिस्तभंग केल्याबद्दल काही बोल सुनावले तेव्हा मी भडकले. मी म्हणाले, ‘‘तुम्ही सुशिक्षित आहात. नैसर्गिक विधींना प्रतिबंध करू नये, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक असेलच. कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था केली नाही, मग स्त्रियांनी रस्त्यावर जायचे का?’’

माझा पवित्रा बघून इतर स्त्रियांनाही चेव आला. त्यांनीही सुरात सूर मिसळला. तेवढय़ात कार्यक्रमाचे पहिले सत्र संपले आणि इतर स्त्रियाही शौचालयाची चौकशी करू लागल्या. काही जणी जवळ कुठे सुलभ शौचालय आहे का ते पाहायला बाहेर पडल्या. काही जणी जवळच राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणींच्या वा नातेवाइकांच्या घरी गेल्या. पण खूप साऱ्या जणी तिथेच तिष्ठत उभ्या राहिल्या. आम्ही ‘शाही’ शौचालय वापरले म्हणून त्या शौचालयाबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला. आलेल्या काही स्त्रिया खूपच संतापल्या होत्या. नैसर्गिक विधीसाठीही आता सत्याग्रह करण्याची वेळ आलेली होती. हे दुर्दैवच म्हणायला हवे. माझ्यासोबत आलेल्या मित्राला मी परिस्थितीचे गांभीर्य सांगितले.

‘‘पुरुषांसाठी मुबलक सार्वजनिक शौचालये असतात, आणि बायकांना आडोशाची सर्वाधिक गरज असताना त्यांचा मात्र विचारच केलेला दिसत नाही. सामाजिक व्यवस्थेची ही असंवेदनशीलता खूप भयाण आहे. नैसर्गिक विधींना दाबून धरल्याने पोटाच्या व इतर अनेक रोगांना आमंत्रण मिळते. स्त्रिया घराबाहेर पडल्यावर दिवसभर विधींचा जोर दाबून धरण्याची सवय लावून घेतात. मासिक पाळीच्या काळात, गर्भवती असताना बाईला शौचालयांची आत्यंतिक गरज असते. तेव्हाही त्यांची भयानक कुचंबणा होते. त्यामुळेही त्यांना अवघड जागी त्वचेचे विकार होऊ  शकतात. मधुमेह, किडणी आजार असणाऱ्या स्त्रिया (व पुरुषांनाही) वारंवार लघवीला जावे लागते. शहराचा किंवा कोणत्याही वस्तीचा विकास आराखडा रेखाटणारे जाणकार लोक, नव्या घरे व इमारती निर्माण करणारे वास्तुविशारद, आपले समाजकारणी, राजकारणी. सगळा समाजच याचा कधी विचार करणार आहे?’’

मित्र अंतर्मुख झाला. पण ती ‘अंतर्मुख होत चिंतन करण्याची’ वेळ नव्हती. हे त्यालाही कळलं आणि तो सर्व स्त्रियांना म्हणाला, ‘‘हे पाहा, स्त्रियांचे शौचालय कुलुपबंद आहे, पण पुरुषांचे शौचालय? ते तर उघडेच आहे ना? मग? विचार कसला करता? जस्ट ऑक्युपाय! बायांनो, जा-जस्ट ऑक्युपाय द जेंट्स वॉशरूम!’’

स्त्रियांना बंडखोरीचे स्फुरण चढले आणि त्यांनी बहुसंख्येने पुरुषांच्या मुतारीवर धाड घातली. दोघीतिघी आलटून पालटून पहाऱ्यासाठी दारात उभ्या राहिल्या. बाकीच्या आत गेल्या. बायकांनी पुरुषांचे शौचालय बळकावल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजकांना हा हा म्हणता समजली. तिथे असणाऱ्या अल्पसंख्य पुरुषांना शौचालयात जायचे होते, पण बहुसंख्यने आलेल्या स्त्रियांच्या झुंडीपुढे त्यांचे कसे काय चालणार? काही संवेदनशील पुरुषांना स्त्रियांच्या स्वच्छतागृहाची समस्या ध्यानात आली. संयोजकांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी ताबडतोब सफाई कामगार बोलावून स्त्रियांचे शौचालय स्वच्छ करून खुले केले. नंतरच्या दिवसभराच्या कार्यक्रमात स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार इत्यादी विषयांवर जी व्याख्याने झाली, त्यातही स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न अनेकांनी गांभीर्याने मांडला. चला म्हणजे, इष्टापत्तीच झाली म्हणायची!

‘‘चला, हे बेस झालं, न्यूयॉर्कमधली ‘ऑक्युपाय चळवळ’ इथं या स्त्रियांमुळे रुजते आहे.’’ मित्र स्मितहास्य करत म्हणाला.

‘‘ऑक्युपाय चळवळ?’’ माझी जिज्ञासा वाढली. पण लगेच पुढचा कार्यक्रम सुरू झाला.

मला माझ्या पूर्वायुष्यातला एक प्रसंग आठवला. मी एका त्वचाविकारतज्ज्ञाचे उपचार घेत होते. अपॉइंटमेंट घेऊनही दवाखान्याच्या प्रतीक्षालयात रुग्णांची भलीमोठी रांग होती. शेवटी असे कळले की अपॉइंटमेंट असली किंवा नसली तरी दोन-तीन तास जातातच! दोन तास झाले तरी माझा नंबर येण्याची चिन्हे नव्हती. दरम्यान आणखी एक तास लोटला. मला शौचालयात जाणे गरजेचे होते. आश्चर्य म्हणजे एवढय़ा मोठय़ा दवाखान्यात रुग्णांसाठी शौचालय नव्हते! कर्मचारी आणि डॉक्टर्ससाठी स्वच्छतागृह होते, पण ते कुलूपबंद. मी रिसेप्शनिस्टला किल्ली देण्याची विनंती केली तर ती म्हणाली, ‘‘सॉरी, ते सार्वजनिक नाही. रुग्णांसाठी मुळीच नाही.’’

‘‘मग रुग्णांनी कुठं जायचं?’’ या माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला ती बांधील नसल्याप्रमाणे तिने दुर्लक्ष केले. माझ्या शेजारी अ‍ॅडव्होकेट असणारे एक रुग्ण बसले होते. ते मला म्हणाले, ‘‘विशिष्ट आकाराच्या (स्केअर फिट) दवाखान्याला शौचालय असलेच पाहिजे, असा नियम आहे. हे डॉक्टर लोक कायदाच धाब्यावर बसवतात.’’ थोडय़ा वेळाने मी रिसेप्शनिस्टला म्हणाले, ‘‘मी या इमारतीबाहेर पडून स्वच्छतागृह शोधते, माझा अपॉइंटनंबर तसाच राहू द्या.’’ तर त्यालाही ही तयार नव्हती. सगळीकडून कोंडी. तेवढय़ात माझाच नंबर लागला. ‘नंतरच जाऊ’ असा विचार करून मी डॉक्टरांपुढे हजर झाले. तपासणी, औषधे दिल्यावर जाता जाता मी माझा ऐरणीवर असलेल्या प्रश्नाला वाचा फोडली, ‘‘डॉक्टर, मी असं ऐकलंय, नैसर्गिक विधी दाबून धरले की अनेक विकार बळावतात.’’ डॉक्टरांनी मान डोलावली.

‘‘त्याने मानसिक संतुलनही ढळू शकतं आणि लक्ष केंद्रित होत नाही. शिवाय त्वचारोगही होऊ शकतात.’’ त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी होकार देत त्याला दुजोरा देणारी आणखी बरीच माहिती सांगितली. मी त्यांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, तर मग तुमच्या टॉयलेटची किल्ली मला ताबडतोब द्यायला सांगा, नाहीतर अनर्थ होईल. माझा हा त्वचाविकार अधिक बळावेल. या दवाखान्यात रुग्णांसाठी शौचालयाची कायमस्वरूपी सोय करा. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला अधिक काही सांगायची आवश्यकता नाही.’’ असे म्हणत मी किल्लीसाठी हात पुढे केला. डॉक्टरांनी असिस्टंट डॉक्टरला खुणा केल्या. मग रिसेप्शनिस्टने (पर्याय नसल्याने) मला शौचालयाची किल्ली आणून दिली.

खरेच! शौचालयासारख्या मूलभूत सोयीसाठी किती झगडा करावा लागतो आपल्या समाजात! गावे, नगरे, महानगरे, गावे वसवताना अध्र्या मैलाच्या अंतरावर सार्वजनिक शौचालयं असायला हवीत. मोठय़ा इमारती, विविध कार्यालये, मॉल्स, बागा-उद्याने, बस स्टँड्स, रेल्वे स्टेशन, संग्रहालये अशा सर्व ठिकाणी भरपूर संख्येने स्वच्छतागृहे असायला हवीत. ती चालू स्थितीत व सर्वासाठी खुली असायला हवीत. कारण आज माणसांचे कामानिमित्त घराबाहेर असण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण आहेत, छोटी मुले आहेत. या सर्वाना सोयीची होतील अशी शौचालये (कमोड व भारतीय पद्धतीची) वाटेवर मुबलक प्रमाणात असायला हवीत. काही खासगी शौचालये अल्प प्रमाणात शुल्क आकारतात. तेही काही प्रमाणात योग्यच आहे. फुकटच्या गोष्टीची किंमत राहात नाही, हे इथेही लागू आहे. सार्वजनिक शौचालये घाण करण्याची बऱ्याच फुकटय़ा लोकांना सवय असते. पाणीच टाकायचे नाही किंवा नळच उपटायचा असेही प्रकार काही नतद्रष्ट लोक करतात. अनेक शौचालयांच्या कडय़ा तोडलेल्या असतात, तर काही ठिकाणच्या बादल्या-मग गायब होतात. म्हणून स्वच्छतागृहे सुस्थितीत ठेवायची तर त्या यंत्रणेलाही खर्च येतोच. त्यामुळे एकवेळ सशुल्क असले तरी हरकत नाही, पण घराबाहेर पडणाऱ्या लोकांचे, विशेषत: स्त्रियांचे हाल कमी व्हायला हवेत. मासिक पाळीच्या ३/४ दिवसांच्या काळात पुरेसे पाणी असलेली स्वच्छ शौचालये जागोजागी असायला हवीत. तिथेच सॅनेटरी नॅपकिन्स विकत मिळाण्याचीही सोय हवी. सॅनिटरी नॅपकिन्स टाकण्यासाठी शौचालयात कचरापेटी असायला हवी.

आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाले आहेच. खेडय़ापाडय़ात ‘घर तिथे शौचालय’ ही योजना राबवावी लागते. हागणदारीमुक्त गावांसाठी जागृती करावी लागते. शहरांमध्ये ‘राइट टू पी’सारख्या चळवळी कराव्या लागतात. ‘सुलभ शौचालय’चे प्रवर्तक डॉक्टर बिंदेश्वर पाठक यांनी शौचालयाच्या जागृतीसाठी भरीव कार्य केले आहे. डॉक्टर म्हापुसकर यांचे यासंबंधीचे कार्यही मोठे आहे. अभिनेता अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही शौचालयाचा व स्वच्छता कामगारांचा प्रश्न छेडला होता. अभिनेत्री विद्या बालन यांनीही दूरचित्रवाणीवर शौचालयाचे महत्त्व मजेदार पद्धतीने सांगणाऱ्या जाहिराती केल्या आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन सुद्धा सामाजिक माध्यमांमधून ‘खुले में शौच’ केल्याने ‘बिमारी और गंदगी घर के अंदर आती हैं’ अशी समजदारीची बात करताना दिसतात. आज महासत्ता होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या भारताने सार्वजनिक शौचालयासारख्या मूलभूत समस्येकडेही अधिक गंभीरपणे आणि स्त्रियांच्या शौचालयांकडे अधिक संवेदनशीलतेने बघणे आवश्यक आहे.

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आपल्या येथील शौचालयात पाणीच नसणे! पाण्याशिवाय स्वच्छता कशी ठेवतात बुवा? हे एक दुष्टचक्र आहे. पाणी नाही म्हणून स्वच्छता नाही, आणि स्वच्छता गृह असून ते ‘स्वच्छच’ नाही! असा हा भयाण विरोधाभास. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची वाईट प्रवृत्ती अनेकांमध्ये दिसते. हे फार दुर्दैवी आहे. पण या सर्वावर मात करण्यासाठी स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा आहे. स्वच्छतागृहांना अद्ययावत सुखसुविधांनी युक्त असे रूप देऊन तिथे रोजगार निर्मिती होऊ  शकेल. या क्षेत्रात आपल्या देशातील अनेक बेरोजगार गरीब व्यक्तींना नोकऱ्या मिळू शकतील. नाममात्र पैसे आकारून ‘सशुल्क शौचालये’ जागोजागी, गल्लीगल्लीत, रस्तोरस्ती, चौकाचौकात, सार्वजनिक ठिकाणी, बागांमध्ये, प्रत्येक मोठय़ा इमारतीत-प्रत्येक मजल्यावर होणे आवश्यक आहेत. ही शौचालये २४ तास खुली असायला हवीत. त्याचे व्यवस्थापन एखाद्या बडय़ा कंपनीकडे देऊन त्यांची गंभीरपणे देखभाल व्हायला हवी. पंचक्रोशीत प्रत्येक १०० फुटांवर अथवा अध्र्या मैलाच्या आत मुबलक प्रमाणात शौचालये असायला हवीत.

लघवीला लागेल म्हणून पाणी न पिण्याऱ्या किंवा अतिशय कमी पाणी पिणाऱ्या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. कित्येक नोकरदार स्त्रिया तर दिवसभर मूत्रविसर्जन करतच नाहीत. संध्याकाळी घरी आल्यावरच त्या शौचालयात जातात. हे किती भयंकर आहे. अनेक रोगांना आमंत्रण देणारं आहे. माझ्या एका मैत्रिणीला मूतखडय़ाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी भरपूर पाणी प्यायला सांगितले आहे. पण ती पठ्ठी-लघवीला लागेल म्हणून पाणीच पीत नाही. तहान-भूक जेवढी मूलभूत आहे, तितकेच विसर्जनसुद्धा मूलभूत आणि महत्त्वाचे आहे. त्यासाठी निशंक आणि निर्भर अवस्था निर्माण होईल, तो सुदिन.

वैयक्तिक पातळीवरसुद्धा आपण काही विधायक उपाय करू शकतो. त्याची सुरुवात आपल्या घरापासून करता येते. घर घेताना किंवा बांधताना उत्तम शौचालयाची मागणी आपण करायला हवी. कमोड वा भारतीय पद्धतीचा संडास या गोष्टीही सोयीने ठरवून कराव्यात. स्वच्छतागृहात किमान निर्दोष नळ, फ्लश, हँडवॉश, सपाता, दिवा आणि व्यवस्थित कडी लागणारे दार इत्यादी गोष्टी असायला हव्यात. आपल्या घरी येणारे मदतनीस, कामगार, वॉचमन, भाजीवाली बाई इत्यादींसाठी शक्य झाल्यास घराच्या वा इमारतीच्या बाहेर अंगणात किंवा पार्किंगमध्ये शौचालये असायला हवीत, असा आपण आग्रह धरावा. आमच्या घरात आम्ही असे एक जास्तीचे शौचालय बांधले आहे. घरी काही तासांसाठी येणाऱ्या मंडळींना शौचालयाचा वापर करायचा असल्यास संकोच वाटणार नाही, असे वातावरण आपण ठेवायला हवे. लहान मुले, तरुण मुली, स्त्रिया आणि वृद्ध मंडळी यांना प्राधान्याने शौचालय उपलब्ध व्हायला हवे. ते सुखद असावे. त्याची एकूणच रचना अशी असावी की जेणेकरून ते अपघाताला आमंत्रण देणार नाही. स्त्री-पुरुषांमध्ये याविषयी मुक्त संवाद असायला हवा. बऱ्याच स्त्रियांना शौचालयाचा विषय काढायला सुद्धा संकोच वाटतो. ओळखीच्या व्यक्तीला, नातलगाला विचारतानाही संकोच वाटतो, तिथे एखाद्या अनोळखी पुरुषाला विचारायची तर सोयच नाही. मला वाटते स्त्रियांनी हा संकोच झटकून टाकायला हवा. जेवढे स्पष्टपणे व धीटपणे स्त्रिया शौचालयांची विचारणा वा मागणी करतील, तेवढा समाज, पुरुषसुद्धा त्या समस्येकडे सहानुभूतीने पाहायला शिकेल. नोकरीच्या ठिकाणी चांगली मुबलक संख्येने शौचालये नसतील तर स्त्रियांनी आवाज उठवायला हवा.

मित्र त्या दिवशी ‘ऑक्युपाय’ नामक चळवळीविषयी काहीतरी म्हणाला होता. तो ऑक्युपाय हा शब्द मनात घोळत होता. मग त्याची जुजबी माहिती मिळवली, ती अशी- न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबर २०११ मध्ये ‘ऑक्युपाय’ ही चळवळ जन्माला आली. आजवर अनेक देशांमध्ये लोकप्रिय झालेली ‘ऑक्युपाय’ नामक चळवळ इथे, भारतात स्त्रियांच्या शौचालयांच्या संदर्भात यायला हवी, असे त्याविषयीची माहिती वाचल्यावर वाटले. कारण ही एक सामाजिक आणि राजकीय चळवळ असून ‘खऱ्या लोकशाहीसाठी’ हे त्या चळवळीचे ब्रीद आहे. ‘ऑक्युपाय एव्हरीथिंग डिमांड नथिंग’ ही त्यांची वैचारिक बैठक असून ‘वुई आर ९९ परसेंट’ हा त्यांचा नारा आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मुलांवर अर्थविषयक अन्याय झाला तेव्हा त्यांनी विद्यापीठाची कँपस इमारत ऑक्युपाय केली, बळकावली आणि न्याय मिळवला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, न्यूझीलंड, नॉर्वे, डेन्मार्क, स्पेन, ब्राझील, कॅनडा, स्वित्र्झलड, इस्रायल इत्यादी अनेक देशांमध्ये या चळवळीच्या माध्यमातून ग्लोबल डेमोक्रसी आणण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याकडच्या असहकार चळवळ, मोर्चा व घेराव घालणे, सत्याग्रह, उपोषण इत्यादी अहिंसक चळवळींशी नाते सांगणाऱ्या या ऑक्युपाय चळवळीची मुहूर्तमेढ भारतात व्हायला हवी. स्त्रियांनीच ती इथे रुजवावी- स्त्रियांच्या शौचालयांच्या संदर्भात! इथे सहनशीलता नकोच..

आश्लेषा महाजन

ashleshamahajan@rediffmail.com

 

 

First Published on September 9, 2017 12:49 am

Web Title: marathi articles on public toilets for women
 1. P
  Prakash Ghatpande
  Sep 10, 2017 at 12:29 pm
  प्रभाकर नानावटी यांचा ऐसी अक्षरे वरील लेख प्रश्न शौचालयांचा : aisiakshare /node/3123 जोपर्यंत शौचालय चळवळ होत नाही तोपर्यंत हे प्रश्न अत्यंत मंदगतीने सुटणार. लेखकाचा उपक्रमावरील गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन हा लेख यानिमित वाचावा. मायबोली वर स्वच्छतेच्या बैलाला.....! हा लेख देखील संवेदनशील आहे. विकसित देशात सार्वजनिक जीवनात पुरेशी व वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे असणे हे गांभीर्याने घेतले जाते.माझ्या मते स्वच्छतागृह हा हक्क असला पाहिजे. एखाद्या संस्थेचे/कार्यालयाचे मूल्यमापन करायचे असेल तर तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहास भेट द्या त्यावरुन त्या संस्थेची लायकी समजते.
  Reply
  1. P
   Prakash Ghatpande
   Sep 10, 2017 at 12:07 pm
   चळवळी च्या अनुषंगाने हा स्त्री प्रश्न म्हणून वेगळा करु नका. तो स्त्री पुरुषांचा एकत्रित प्रश्न म्हणून घ्या तसेच टॊयलेट म्हणजे मुतारी नव्हे त्याच अर्थ शौचालय आहे. पण लोक मुतारीलाच टॊयलेट म्हणतात. तसेच शौचालयात मूत्र विसर्जनाची सोय असते व मुतारी फक्त मूत्रविसर्जनाची सोय असते.त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर करताना ते शौचालयाचे असावे. गणेश विसर्जनाच्या वेळी धनंजय देशपांडे या व्यक्तीने पोलीसांसाठी ती सोय केली त्याचा अनुभव वाचा
   Reply
   1. P
    Prakash Ghatpande
    Sep 10, 2017 at 11:56 am
    शौचालयाचा हक्क नाकारणार्‍या संस्था व त्या दवाखान्याची नावे पण लिहा ना. लोकांना कळू द्यात. अनेक डॊक्टरांचे कन्सल्टिंग रुम असते पण स्वतंत्र शौचालयाची सोय नसते. प्रभात रोड वर डॊ अनिल काटदरे यांचे अलिशान क्लिनिक आहे तिथे पण तीच परिस्थिती आहे. शौचाल्याची जागा काढून तिथे तपासणी बेड ठेवलाय
    Reply
    1. P
     Prakash Ghatpande
     Sep 10, 2017 at 11:43 am
     आंतरजालावर देखील याबाबत जागृती मोठ्या प्रमाणावर व्यक्त होते आहे. मायबोली संकेतस्थळावर असलेल्या या लिंंक पहा : vishesh.maayboli /node/26 स्वच्छतेच्या बैलाला.....! s: maayboli /node/4327 ' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..
     Reply