सतीश काळसेकर यांचे ‘पायपीट’ हे पुस्तक म्हणजे पायी चालण्यातून देशाटन करणाऱ्या भटक्याचे अनुभवकथन आहे. गेली जवळपास पन्नासहून अधिक वर्षे पायी चालत केलेल्या विविध भटकंतीचा, त्यातील चित्रविचित्र अनुभवांचा, माणसांचा, निसर्गाचा, स्थानिक माणसांच्या भल्याबुऱ्या आठवणींचा, खाद्यपदार्थाचा, त्या त्या ठिकाणच्या चालीरीतींचा, धर्म-परंपरांचा आणि एकूणच त्या त्या ठिकाणी जाणवलेल्या नोंदींचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. ऋग्वेदात, सूर्यसूक्तात ‘चरैवेति’- चालत राहा, असे सूर्य वारंवार सांगतो. त्याचा शब्दश: पाठपुरावा करत लेखकाने माथेरान-महाबळेश्वरपासून सातपुडा, सौराष्ट्र तसेच महाकाय पसरलेल्या हिमालयातील विविध ठिकाणे, गंगा-यमुना-भागीरथी-अलकनंदा-बियास अशा किती तरी नद्या आणि पर्वत-पहाड-दऱ्या पादाक्रांत केल्या. चारी धाम यात्रा तर घडलीच, पण एकीकडे हिमाच्छादित दार्गिलिंग-सिक्कीम तर दुसरीकडे बिकानेर-कच्छ-भूजचे वाळवंट. वेळोवेळी झालेल्या ह्या पायपिटीविषयी काळसेकरांनी केलेले लेखन विविध अंकांतून प्रसिद्धही झाले. ते विखुरलेले लेख, त्यातच त्यांच्या डायरीतील ‘आँखो देखा हाल’ दर्शवणाऱ्या नोंदी, आठवणी.. त्याचेच हे एकत्रित पुस्तकरूप.
‘या देशाने मज दिले अपार’ अशी कृतज्ञता लेखक व्यक्त करतोच, पण नकाशावरल्या सीमा, राष्ट्रगीताचे शब्द, इतिहासाची पाने, धर्म-जाती.. या साऱ्यांच्या पलीकडे जाऊन आपला देश ‘पाहणाऱ्या’ लेखकाचा बालपणापासून भूगोल हा नेहमीच आवडीचा विषय होता. हा देश, त्याची माती, निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले, तिथली आपल्यासारखीच माणसे यांच्याविषयी अपार कुतूहल आणि जिव्हाळा हे ह्या भटकंतीचे श्रेयस आहे. विराट निसर्गाच्या सान्निध्यात आपसुकच आपले धाकुटेपण उमजते नि माणूस नम्र होतो. माणसाचे पाय मातीचेच असतात, ह्याचा अनुभवही अधूनमधून पुस्तक वाचकाला देते. भटकंतीच्या अनावर ओढीविषयी लेखक ‘चालणाऱ्याचे पाय’ या लेखात म्हणतो, ‘‘भटकता भटकता समज वाढते. ज्ञानात भर पडते. कुतूहल शमते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपला ‘समजूतदारपणा’ वाढतो. माणसामाणसांतील संबंधांचा गुंतागुंतीचा गोफ समजून घेता येतो. सोशिकपणा वाढतो. खरे गरजेचे काय आणि केवळ मिरवायचे काय, याचा थांग लागतो. आपल्या मातीचे अस्सल मातीपण कशात आहे, ते कळते. आपल्या देशीपणाचा साक्षी झाल्याचा एक भक्कम आधार मिळतो.’’ एका अर्थी लेखकाला स्वत:च स्वत:लाच आजमावण्याचाही हा प्रवास आहे. ‘पायपीट’ या लेखातही पायी चालण्याच्या सवयीच्या सविस्तर आठवणी आहेत. पायपिटीच्या जीवनशैलीचा वृत्तांत आहे. हे लेखन सोपे आहे. जे घडले ते, जे वाटले ते आणि जसे मांडावेसे वाटले तसे उतरले आहे. कधी कधी मधूनच भरकटल्यासारखे वाटते, पण मग नंतर लेखक मूळ मुद्दय़ावर येतो. लेखनात लेखकाच्या स्वभावातला साधेपणा आहे, सच्चेपणा आहे. प्रवासवर्णन म्हणून पुस्तकाला चौकटीत बसवता येत नाही. त्यात आनुषंगिक बरीच चर्चा येते. ती विषयांतरासारखीही वाटू शकते. उदा. ‘मी आणि माझे भोवताल’ हा लेख विविध प्रवासांदरम्यान घडत असणाऱ्या वर्ग-वर्णव्यवस्थेवर भाष्य करतो. ‘प्रवास : चाकावर’ व ‘अधूनमधून पॅसेंजर’ हे लेख अनुक्रमे बस व रेल्वेप्रवासातील साधेभोळे अनुभव सांगतात. एक ठिकाण समोर ठेवून त्याचे सर्वार्थाने वाचकांना दर्शन घडवणे, असे हे साचेबद्ध लेखन नाही. ‘गोपेश्वरचा स्वातंत्र्यदिन’, ‘ही वाट दूर जाते’ हे लेख त्यादृष्टीने पाहायला हवेत.
काळसेकरांना ‘बुलावा आया है’चा प्रत्यय हिमालयाने अनेकदा दिलाय. त्यामुळे त्यांच्या ‘ग्रो यंग ट्रेकर्स’साठी ‘साद देती हिमशिखरे’ हे ओघाने आलेच. अमरनाथ, कैलास, मानसरोवर, गंगोत्री, जमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ येथे पायपीट करताना महाभारतातले किती तरी संदर्भ सापडत राहतात. पांडवांचे स्वर्गारोहण, हिडिंबेचे मंदिर, भीमशिळा इत्यादी. लेखक हे सारे सहज ओघात सांगतात. महाकवी कालिदास, संत तुकाराम, गालीब, रस्किन बॉन्ड, साहीर लुधियानवी, शांताबाई शेळके यांच्यासह स्वत:च्या काव्यपंक्तींचे श्रुतयोजनही यात आहे. पूर्वी ज्यांनी हे प्रवास केलेत त्यांचे संदर्भ, त्यांच्या प्रवासवर्णनपर पुस्तकांचे संदर्भ लेखकाने दिलेत. अगदी महाभारतातील प्रवासापासून आदिशंकराचार्य-विवेकानंद-विनोबा इत्यादी. ‘‘गढवाल ‘यातायात’ आणि वृत्तांत’’ हे प्रकरण तर सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या विविध प्रवासवर्णपर पुस्तकांविषयीच आहे. पूर्वीचा खडतर व हल्लीचा काहीसा सुलभ प्रवास, प्रवासासाठी अनुकूल काळ, प्रवासाची तयारी, कपडे, आरोग्यरक्षणार्थ खबरदारी, शिधा किती-कसा घ्यावा (पान ९२, ९३ वर कोष्टकच दिलेय.) अशा अनेक विषयांवर सहज चर्चा आहे. कमी पैशात, आवश्यक त्या गरजा भागवत जमिनीवर पाय रोवून, साधेपणातील श्रीमंती अनुभवत प्रवास कसा करावा, याचा वस्तुपाठ ते देतात.
काळसेकर जाता जाता निरीक्षणे नोंदवतात. त्यात निसर्गाचे सौम्य-रौद्र रूप असते, तसे पशू-पक्षी-कीटकांचे विश्वही असते. ‘नेवला (म्हणजे मुंगूस) ते कोल्हा’, ‘जळवा, ट्राऊट आणि रुंडा’, ‘फुले, फुलपाखरे, सरोवरे’ अशा काही लेखांमध्ये ससा, मुंगूस, उंदीर, सुवर्णगरुड, पारवे, बुलबुल, उडत्या खारी, कस्तुरीमृग, माकडे, मोर यांच्यासोबतची भटकंती आहे. ‘जळवा’ चिकटण्याचा जीवघेणा अनुभव आणि ट्राऊट-‘मासेमारी’ हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मधले रानगुलाब, ब्रह्मकमळ, बर्फकमळ, निळी पॉपी इत्यादी फुले नि त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या आणि तिथल्या दुर्मीळ औषधी वनस्पतींविषयीच्या नोंदीही कुतूहल वाढवणाऱ्या आहेत.
‘गंगा नदीची गोष्ट’, ‘यमुनेच्या काठाने’मध्ये गंगेच्या व यमुनेच्या उगमापासून तर त्यांच्या कथा-काव्याचे संदर्भ आहेत. गंगा-पार्वतींमधील सवतीमत्सर सर्वश्रुत आहेच. ‘आणि गिर्यारोहिणी’मध्ये गिरिभ्रमण करणाऱ्या तरुणींच्या जिद्दीचे कौतुक आहे. गढवालविषयी लेखकाने बरेच लिहिले आहे. भटकंतीत निसर्ग-सौंदर्याचे साक्षात्कार तर ‘ब्रह्मानंद’ स्वरूपाचेच वाटले लेखकाला. मनाली-बियास नदी परिसरास हल्ली पर्यटनाच्या ‘धंद्याची’ लागण झाल्याने बकाल झाला आहे. त्यामुळे ‘बियासकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ असे लेखक खेदाने म्हणतो. लेखकाने हिमालय अनेकदा, विविध काळांत, विविध बाजूंनी पाहिला, तरी ‘काही तरी बाकी आहे’ असे त्यांना वाटते आणि त्यातूनच पुन्हा हिमशिखरे त्यांना साद घालतात.
माणूस, मैत्री, नाती यांचे अनोखे, चित्रविचित्र दर्शन प्रवासात घडत असते. स्त्री-पुरुष मैत्रीचे वेगवेगळे कंगोरेही त्यात असू शकतात. कुलूमधील हरमिश ह्या घरगुती भोजनालय चालवणाऱ्या तरुण विधवेशी लेखकाचे असेच स्नेहबंध जुळले. स्त्री-पुरुष मैत्री मोकळेपणाने स्वीकारण्याची आपल्याला सवय नाही. आपल्या खासगी आयुष्याला सर्वजनिक आयुष्याची गाठ असल्याने त्यातील काही ‘गाळलेल्या जागा’ लेखकाने ‘हरमिश, मी आणि आमचे कुटुंब’ या लेखात दिल्यात. ‘डायरी आणि आठवणी’ ही चक्क डायरीच आहे- १ मे ते २५ मे १९७२ या २५ दिवसांची. छोटय़ा छोटय़ा वाक्यांची. अस्सल अनुभवजन्य! साची-विदिशा-भोपाळ-जबलपूरपासून कोलकत्त्यापर्यंतच्या भल्यामोठय़ा यात्रेचा नि त्या काळाचा जणू दस्तऐवजच. त्यात नोंदी आहेत, मित्रांसोबत चकाटय़ा पिटल्यात, वैताग आहे, राजकारणावर तोंडसुख घेतलेय, सौंदर्य-दारिद्रय़ाचे दर्शन आहे, खाबुगिरीची धमाल आहे. प्रवास म्हणजे ‘विश्वरूपदर्शन’च जणू. काळसेकरांना ते दिसते. जागेपणी त्यांना भ्रमंतीचीच स्वप्ने पडतात. आणि झोपेतही ते बर्फाच्छादित पहाडातल्या घोंघावणाऱ्या वाऱ्यासोबत संवाद साधत राहतात. सर्वसामान्य वाचकांना माहितीसोबतच अनोख्या अनुभवांची गंमत लाभेल, तर दस्तुरखुद्द भटक्या वाचकांना आपल्याच अनुभवांचे हे शब्दरूप आहे, असे वाटेल- गप्पा मारल्यासारखे. आधी म्हटल्याप्रमाणे हे ठरावीक साच्यातील प्रवासवर्णन नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात स्थळ, काळ, गाडी, तिकीट, अमुक पॉइंट, तमुक हॉटेल, इतके किलोमीटर, अमुक वातावरण अशा ठरावीक व सविस्तर नोंदी क्रमाने दिलेल्या नाहीत. तर प्रवासाच्या अनुषंगाने केलेले विचारमंथन आहे. ‘बरेच काही बाकी आहे’ हा प्रांजळपणा खुद्द लेखकाचा आहे, तसा तो वाचकालाही जाणवेल. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळाच असतो ना!
पुस्तकाची निर्मिती, बांधणी, शब्द-मांडणी, कागद उत्तम व सुबक आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ शीर्षकाला समर्पक आहे. पण या पुस्तकात आवश्यक तिथे छायाचित्रे, रेखाचित्रे, नकाशे का नाहीत, असा प्रश्न पडतो. लेखकाच्या शब्दचित्राला छायाचित्रांमुळे दृश्यमूल्य प्राप्त होते आणि वाचकाला सोबत नेत सहअनुभूती देता येते. त्यापासून मात्र वाचक वंचित राहतो.
‘पायपीट’
सतीश काळसेकर
लोकवाङ्मय गृह, मुंबई
पाने- २३६, किंमत- २५० रुपये
आश्लेषा महाजन – ashleshamahajan@rediffmail.com