कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधन

पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी रोज अक्रोडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, असे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे शुक्राणू तयार होतात. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉस एंजल्स स्कूल ऑफ नर्सिगच्या संशोधिका वेंडी रॉबिन्स यांनी हे संशोधन केले असून त्यात पुरुषांमध्ये अक्रोडचा वापर केल्यास पुरुषांची शुक्राणू क्षमता सुधारते, असे म्हटले आहे.
वंध्यत्व हे काही वेळा शाप ठरते त्यात शुक्राणूंची कमी संख्या किंवा सक्षमतेचा अभाव यामुळे पुनरुत्पादनात अडचणी येतात. रॉबिन्स यांच्या मते दररोज ७५ ग्रॅम अक्रोड सेवन केले तर शुक्राणूंची हालचाल सुधारते आणि सक्षमताही वाढते. २१ ते ३५ वयोगटातील पुरुषांमध्ये हा परिणाम दिसून आला. बायोलॉजी ऑफ रिप्रॉडक्शन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
जगात ७ कोटी जोडप्यांना वंध्यत्वामुळे मुले होत नाहीत. त्यात ३० ते ५० टक्के घटनांत पुरुषांच्या शुक्राणूंचा दोष असतो. अमेरिकेत ३३ ते ४७ लाख पुरुष वंध्यत्वाचे उपचार घेत असतात. अक्रोडमध्ये अशी पोषके असतात जी पुनरुत्पादक आरोग्य वाढवतात. अक्रोडमध्ये अल्फा लिनोलेईक आम्ल असते व ते एरवी ओमेगा ३ मेदाम्लाचा एक वनस्पतिजन्य प्रकार आहे.
या आम्लामुळे शुक्राणूंची अनियमितता कमी होते. अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतात व अनेक सूक्ष्म पोषके असतात. अन्नाचा मानवी पुनरुत्पादनाशी संबंध असतो. आईच्या आहाराचाही त्याच्याशी संबंध असतो पण पुरुषांच्या आहारावर फार कमी लक्ष दिले जाते असे पोषण सल्लागार कॅरोल बर्ग स्लोन यांनी सांगितले. वडिलांच्या म्हणजे पुरुषांच्या आहाराचा संबंध वंध्यत्वाशी असतो, पण होणाऱ्या बाळाच्या आरोग्याशीही संबंध असतो. ११७ प्रौढांवर यात प्रयोग करण्यात आला त्यांना ७५ ग्रॅम अक्रोड रोज देण्यात आले असता १२ आठवडय़ांत शुक्राणूंमध्ये सुधारणा दिसून आली, असे रॉबिन्स यांचे म्हणणे आहे.