तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित प्राप्तिकर विभागाकडून काही नोटीस आली आहे? पण घाबरुन जाण्याचे कारण नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की विभागाकडून दरवर्षी असंख्य लोकांना नोटीस पाठवली जाते. त्यामुळे विनाकारण त्रासून जाण्याचे कारण नाही. आतापर्यंत आयकर विभागाने ८ हजार जणांना छाननी नोटीस पाठवली असून, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. इतकेच नाही तर मागच्या वर्षी विभागाने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत एकूण ४० हजार जणांना ही नोटीस पाठवली होती.

प्रत्यक्षात फाईल झालेल्या रिटर्न्समधील छाननीसाठी निवडण्यात येणाऱ्या केसची संख्या कमी असते. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डातर्फे दरवर्षी छाननीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातात. जी रिटर्न्स पहिल्यापासून संशयाच्या फेऱ्यात असतात त्यांची जास्त प्रमाणात चौकशी होते. नोटीस आलेल्या सर्वांचीच कडक चौकशी केली जाते असा सुरुवातीच्या काळात समज होता. मात्र तसे नसून यातील ठराविक जणांचीच चौकशी करण्यात येत असल्याचे यातील तज्ज्ञांनी सांगितले.

३० जुलै ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी आपल्या उत्पन्नाबाबत योग्य ती प्रक्रिया केली नाही त्यांच्यासाठी आणखी एक आठवडा वेळ आहे. मात्र तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस आली असल्यास नेमके काय करावे याबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे. या नोटिशीला उत्तर देण्याचा पर्याय उपलब्ध असतो. यामध्ये करदात्याला माय अकाऊंटवर जाऊनही हे उत्तर देता येते. त्यामुळे हे उत्तर देण्यासाठी आयटी अधिकाऱ्याला भेटण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आता ऑनलाइन झाल्याने करदात्यांनी करविभागाबाबत आपले मत बदलण्याची आवश्यकता आहे.