भारतात मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून तेथे मधुमेहींचे प्रमाण ४० टक्केआहे, त्यापाठोपाठ मुंबई व अहमदाबाद यांचा क्रमांक आहे. दिल्लीत ४२.५ टक्के लोकांना मधुमेह असून मुंबईत हे प्रमाण ३८.५ टक्के आहे तर अहमदाबादमध्ये ३६ टक्के, बंगळुरूत २६.५ टक्के, चेन्नईत २४.५ टक्के प्रमाण आहे.

हैदराबाद व कोलकाता येथे २२.६ टक्के व १९.७ टक्के लोक मधुमेही आहेत. ग्रामीण भागातही मधुमेहींचे प्रमाण वाढते आहे, असे अ‍ॅसोचेमच्या ‘डायबेटिस ऑन राइज इन इंडिया’ या अहवालात म्हटले आहे. या अहवालात म्हटल्यानुसार भारतात २०३५ पर्यंत १२५ दशलक्ष लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. जीवनशैली व अन्नाच्या सवयी यामुळे हे प्रमाण वाढत आहे. मधुमेहामुळे आर्थिक ताणही वाढत असून लोकांची कार्यक्षमता व जीवनमान कमी होत आहे. दिल्लीत लोक जास्त तेल, तूप व प्रक्रिया केलेले लोणी खातात त्यामुळे लठ्ठपणा व रक्तदाब वाढत आहे. मधुमेहाचे प्रमाण पुरुषात २५ टक्के तर स्त्रियांत ४२ टक्के वाढले आहे. २०-२९ वयोगटांतील ५५ टक्के, ३०-३९ वयोगटातील २६ टक्के, ५० ते ५९ वयोगटातील २ टक्के तर ६०-६९ वयोगटातील १ टक्का प्रतिसादक यात सहभागी होते. खासगी उद्योगातील १८ टक्के लोकांचा सहभाग यात होता. दिल्ली, मुंबई, बंगलोर, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, चंदिगड, डेहराडून व इतर शहरांचा अभ्यासात समावेश होता. प्रत्येक शहरातून ५०० कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)