निदर्शनांमुळे रुग्णालयात जाणे कठीण; १३३ रुग्णवाहिकांचे नुकसान

काश्मीर खोऱ्यातील अशांत परिस्थितीचा परिणाम तेथील रुग्णालयांवर झाला आहे. रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनेक ठिकाणी संचारबंदी असल्याने रुग्णांना पोहोचणे कठीण झाल्याचे बारामुल्ला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सय्यद मसूद यांनी स्पष्ट केले.

रुग्णवाहिकांनाही अशांत परिस्थितीचा फटका बसला आहे. निदर्शनांमुळे दिवसा तर सुरक्षा कारणांनी रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका नेणे कठीण झाले आहे. रुग्णवाहिकेच्या  चालकांना अनेक ठिकाणी निदर्शकांनी मारहाण केली आहे आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका आम्ही श्रीनगरमधील रुग्णालयांमध्ये पाठवणे टाळतो असे मसूद यांनी स्पष्टकेले. सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या दीड महिन्यात १३३ रुग्णवाहिकांचे निदर्शकांनी नुकसान केले आहे.

हृदयविकाराच्या रुग्णांमध्येही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. रोज जेथे ५० रुग्ण येत असतील तर आता हे प्रमाण १५ ते २० झाले आहे. ज्या रुग्णांना येणे जमत नाही त्यांची प्रकृती खालावू नये असे एका डॉक्टरने स्पष्ट केले.  याखेरीज केमोथेरेपीसाठी जे मोठय़ा रुग्णालयांमध्ये जातात, त्यांच्यासाठी स्थानिक ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र र्निबधांमुळे फारच थोडय़ा जणांना याची माहिती आहे.

मध्य काश्मीरमधील अब्दुल रहिम लोन यांना अशांत परिस्थितीचा मोठा फटका बसला. त्यांच्या गर्भवती सुनेला रुग्णालयात नेताना सुरक्षेचे अडथळे पार करताना खूप त्रास झाला. रुग्णवाहिकेतून जात असताना अनेक ठिकाणी उतरून स्वत: लावलेले अडथळे दूर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यात बराच कालावधी गेल्याने रुग्णाला त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.