अधिकाधिक मांसाहारामुळे शरीरातील मेद वाढून यकृताचे आजार, कर्करोग,   रक्तवाहिन्यांचे आजार आणि हृदयरोग होण्याचा धोका अधिक असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

सोडा, साखर आणि फळे यांचा समावेश असलेले पदार्थ मांसाहाराच्या तुलनेत शरीराला हानीकारक नसल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मद्यरहित मेद यकृत रोग (एनएएफएलडी) हा आरोग्यासाठीचा मोठा धोका असून त्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

एनएएफएलडीमुळे जिवाला धोका असल्याने अशा वेळी यकृताचे प्रत्यारोपण करणे आवश्यक ठरते. त्याचप्रमाणे यामुळे मधुमेह, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार उद्भवत असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. यकृताजवळ मेदाचे प्रमाण वाढल्यामुळे यकृताशी संबंधित हे आजार होत असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले.

जगभरातील एक अब्ज लोक एनएएफएलडीमुळे त्रस्त असून यातील २०-२० टक्के लोक पाश्चिमात्य देशांतील आहेत. संपूर्ण देशाला भेडसावणारी ही मोठी आरोग्याची समस्या आहे. सध्याची जीवनशैली बदललेली असताना वजन घटविण्याकडे सर्वाचाच कल असतो.

मात्र त्यामुळेच यकृताचे जीवघेणे आजार भेडसावू लागले आहेत. वजन घटविण्याबरोबरच त्या वेळी घेतला जाणारा आहारही या आजारास कारणीभूत ठरतोय का, याबाबतही चर्चा झाली. त्यानंतर मांसाहारही या आजारांना निमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती नेदरलँडमधील वैद्यकीय केंद्रातील लुईस अल्फेरिंक यांनी दिली.