हल्लीच्या आरामदायी जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. निव्वळ वजनात घट करून हा धोका रोखता येणे शक्य नाही. तर कमी केलेले वजन नियंत्रणात ठेवणेही लठ्ठपणाच्या रूग्णांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. अन्यथा, वजनाच्याबाबतीत पुन्हा एकदा ‘जैसे थे’ परिस्थिती होण्याचे प्रमाण गेल्या काही काळात झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे आत्ताच्या काळात वजन कमी करणाऱ्या उपचारपद्धती आणि डाएटस लठ्ठपणाची समस्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत.
लंडन येथील किंग्ज महाविद्यालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात या समस्येने उग्र स्वरूप धारण केल्याचे समोर आले आहे. एखाद्याने परिश्रमपूर्वक वजन कमी केले तरी एका विशिष्ट काळानंतर पुन्हा ती व्यक्ती लठ्ठ होण्याचाही धोका पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याची बाब या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. लठ्ठपणाच्या समस्येवर मात करून पुन्हा साधारण वजनापर्यंत पोहचण्याचे प्रमाण यापूर्वी पुरूषांमध्ये २१० पैकी १ आणि महिलांमध्ये १२४ पैकी १ असे होते. मात्र, नव्या सर्वेक्षणानूसार पुरूषांमध्ये हेच प्रमाण १,२९० पैकी १ आणि महिलांमध्ये ६७७ पैकी १ असे झाले आहे. म्हणजेच एकदा लठ्ठपणावर मात केल्यानंतर पुन्हा त्याच समस्येला सामोरे जावे लागण्याचा धोका वाढला आहे.
२००४ ते २०१४ या काळामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १,२९,१९४ पुरूष आणि १,४९,७८८ अशा एकूण २,७८,९८२ जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आपल्या वजनात पाच टक्क्यांची घट केलेल्या आणि स्वत:चे वजन घटवून साधारण वजनापर्यंत आणणाऱ्या दोनप्रकारच्या लोकांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण लोकांमधील दर १२ पुरूषांपैकी एका पुरूषाने आणि दहा जणींपैकी एका महिलेने आपले वजन पाच टक्क्यांनी कमी केले होते. मात्र, यापैकी ५३ टक्के लोकांचे वजन दोन वर्षांनी पुन्हा पूर्वपदावर आले. तर, ७८ टक्के लोकांचे वजन पाच वर्षानंतर पुन्हा आहे तितकेच झाले. त्यामुळे सध्या लठ्ठपणा रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपचारांचा विशेष फायदा होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. हे उपचार करताना लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या रूग्णाच्या वजनात ५ ते १० टक्क्यांची घट झाल्यास सर्व काही आलबेल असल्याचे मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात थोडेसेदेखील वजन कमी करणे हीच लठ्ठ रूग्णांसमोरील मोठी समस्या आहे. त्यानंतरही कमी केलेले नियंत्रणात ठेवण्यासाठी रूग्णांना प्रचंड धडपड करावी लागत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. सर्वेक्षणाचे मूल्यमापन करणाऱ्या डॉ. अॅलिसन फिल्डेस यांच्या मते प्रौढ व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवल्यास त्या व्यक्तीचे वजन पूर्ववत होणे फार अवघड असते. त्यामुळे सध्याच्या लठ्ठपणा रोखणाऱ्या उपचारपद्धतींनी वजन कमी करण्यापेक्षा वजनातील वाढ रोखण्यालाच प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे फिल्डेस यांनी सांगितले.