आरुषी तलवार आणि तिच्या घरातील नोकराची हत्या होऊन नऊ वर्षे उलटली तरी मारेकरी अजूनही मोकाट आहेत. या संदर्भात संपूर्ण निकालपत्राचे आलेले विश्लेषण अधिक बोलके आहे. या हत्यांच्या बाबतीत प्रथमपासूनच तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे स्पष्ट आहे. तलवार यांच्या घरात आणि गच्चीत एकाच वेळी हत्या होऊनही गच्चीत झालेली हत्या तपासयंत्रणांच्या दोन दिवसांनी लक्षात येते. असा तपास करणारा अधिकारी पोलीस खात्यात शिपाई पदाच्या लायकीचा नाही. त्यानंतर १५ दिवस पोलिसांनी तपासात (की पुरावे नष्ट करण्यात) वेळ घालवला आणि नंतर केस सीबीआयकडे सोपवण्यात आली, तोपर्यंत केस पूर्णपणे कमजोर करण्यात आली होती. एकाच घरात एका वेळी दोन हत्या होतात आणि घरात राहणारे त्यासंदर्भात काहीही सूतोवाच करू शकत नाहीत हे निश्चित खटकणारे आहे. म्हणून सीबीआयने काही वर्षांपूर्वी क्लोजर रिपोर्ट उच्च न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने तो मान्य केला नाही आणि आता त्याच न्यायालयाने केवळ पुराव्याअभावी तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका केली आहे. एकूणच या खटल्यात देशातील सर्व व्यवस्था तोकडय़ा पडल्या आणि मारेकरी मोकळे फिरत आहेत. काहीही असो, पण खरे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत तलवार दाम्पत्यावर ‘अविश्वासाची तलवार’ लटकत राहील.

-उमेश मुंडले, वसई

 

गूढाची तुटलेली तलवार

असे सांगतात की न्यायदेवता आंधळी असते आणि त्याच न्यायदेवतेच्या हातात एक तलवार असते. आजकाल त्या तलवारीला गंज चढला आहे की काय, असे वाटायला लागण्याच्या पाश्र्वभूमीवर आरुषी हत्याकांडाचा निकाल हाती येत आहे.हा निकाल यायला तब्बल नऊ  वर्षे लागली. त्यातली चार वर्षे तलवार दाम्पत्याने कैदेत काढली. नऊ  वर्षांनंतरसुद्धा न्यायव्यवस्था हे शोधून काढू शकली नाही की आरुषी आणि हेमराज यांचा खून कोणी केला. ‘गूढाची टांगती तलवार’ तशीच लटकावत ठेवून न्यायालयाने तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका केली. या निकालावर ‘तलवार’ चित्रपटाचा काही प्रभाव पडला असेल का, हे सांगणे तसे कठीण असले तरी चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचे ‘चित्रपटाच्या यशाचा आनंद आता साजरा करेन’ हे वक्तव्य खूप काही सांगून जाते. त्यांच्या मते विजयाचा आनंद आहे, पण जे नुकसान झाले आहे ते कधीही न भरून येणारे आहे, एक पोकळी सतत जाणवत राहील.

खुन्यांचा शोध नाही लागला, पण ज्या जन्मदात्यावर आरोप होता त्यांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या प्रकरणांचे काय? तिथे तर अजून तपास चालू आहे. आरोपपत्र आणि खटला तर अजून दूरच. आरुषी आणि हेमराज यांना ज्याप्रमाणे अजून न्याय मिळालाच नाही तसे यांचे होणार नाही अशीच आपण त्या न्यायदेवतेकडे प्रार्थना करू या.

– रॉबर्ट लोबो, सत्पाळा (विरार)

 

सेनेच्या ‘चेकमेट’मुळे भाजपची भंबेरी

मुंबईच्या पालिका निवडणुकीत भाजपाची एक जागा वाढल्यावर महापालिकेत लवकरच ‘भाजपचा महापौर असेल’ अशी घोषणा भाजपच्या बोलघेवडय़ा नेत्यांनी केली. खरे तर या घोषणेला काहीच अर्थ नव्हता. केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी अशी घोषणा केली. परंतु अशी घोषणा करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं चांगलाच धक्का दिला. मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना सेनेत घेऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. सेनेच्या या खेळीमुळे भाजप घायाळ झाला. पण आमचा महापौर मुंबई महापालिकेत होणार अशी वल्गना करणाऱ्या भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. आपल्याकडे पक्षांतराची परंपरा काही नवीन नाही.  इंदिरा गांधींनंतर आता भाजप पक्ष तोडफोडीचे राजकारण करीत आहे. पण शेवटी राजकारणात पडद्यासमोर जे काही घडते त्यापेक्षा पडद्यामागे जे काही घडते, ते अधिक महत्त्वाचे असते आणि परिणामकारक असते. एक मात्र निश्चित भीतीपोटी का होईना सेनेच्या चेकमेटमुळे भाजपची पुरती भंबेरी उडाली.

– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

 

काँग्रेसमधील असाही विरोधाभास..

भाजपला  ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. काँग्रेससाठी बऱ्याच काळानंतर नांदेड येथे अशोक चव्हाण यांनी निर्विवाद विजयश्री खेचून आणली तरी राहुल गांधींनी २४ तासानंतर त्यावर भाष्य केले आणि श्रेय देताना अशोक चव्हाण यांचे नावही घेतले नाही. राहुल गांधींना सध्या येत असलेल्या निवडणुकीतील अपयशामुळे त्यांना अशोक चव्हाण यांची असूया वाटली किंवा ते पक्षात डोईजड होतील ही भीती वाटली असावी. पण या बोटचेपे धोरणामुळे काँग्रेसची वाढ खुंटली आहे हे निश्चित!  दुसरीकडे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा अधिक पात्रतेचे होते, असे विधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोकळ्या मनाने करून दोघांचेही मोठेपण जपलेले दिसले. वास्तवाचे भान ठेवून समोरच्याचे कौतुक फक्त मोठय़ा मनाची माणसेच करू शकतात. कारण त्यांना खुजे होण्याची भीती वाटत नसते.

-नितीन गांगल, रसायनी

 

कीटकनाशक विक्रेत्यांची पात्रता तपासावी

कापसावरील अळ्या मारण्याच्या नादात जेथे माणसं मेली तिथे अधिक उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा ती काय ठेवणार? नुकत्याच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली आहे. या शेतकऱ्यांचा मार्गदर्शक कोण असतो, कोण या तीव्र विषारी औषधांची शिफारस करतो याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही म्हणून असे घडते. विक्रेते तज्ज्ञ असतात का, त्यांच्याकडे कृषी पदवी असते का आणि असेल तर विशिष्ट कंपनीची औषधे विकावी म्हणून त्यांच्यावर काही दबाव आला की हेही तपासले पाहिजे. विक्रेत्यांसाठी कंपनीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. सगळेच दुकानदार या मोहाला बळी पडत नसले तरी अनेक जण हा मोह टाळू शकत नाहीत. अज्ञान शेतकरी त्यांच्या जाळ्यात अलगद अडकतो. यासाठी कीटकनाशकांच्या विक्रेत्यांची पात्रता तपासावी आणि वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांनी त्या दुकानातील औषधांची तपासणी करावी, तरच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

-लहू चंद्रकांत गाढवे, राक्षसवाडी (ता. कर्जत, जि. अहमदनगर)

 

सर्वपक्षीय नेत्यांनी नानाजींपासून प्रेरणा घ्यावी

‘बोले तैसा चाले’ हा ऋषीतुल्य नानाजी देशमुखांवरील लेख (रविवार विशेष, १५ ऑक्टो.) सर्वपक्षीय राजकारण्यांना दिशा दाखविणारा आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन फक्त समाजकारण करणे हे सर्वाना जमतेच असे नाही, पण नानाजींनी तसे करून दाखविले. त्यांचा चित्रकूट प्रकल्प तर देशाची शान आहे. एकूणच आजच्या ज्येष्ठ राजकारण्यांनी नानाजींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन राजकारणातून निवृत्त व्हावे. सर्व मोह टाळून पायाभूत समाजकार्याकडे वळावे. त्यामुळे तरुणांना राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळेल आणि भरीव समाजकार्यामुळे देशाच्या विकासाला वेग येईल.

-माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

दीनदयाळ उपाध्याय आता भाजपचे ‘नेहरू’?

भाजपने कँग्रेस पक्षावर नेहमी टीका केली की प्रत्येक योजना व प्रकल्पाला नेहरू-गांधी घराण्यातील लोकांचे नाव दिले जाते. त्याच धर्तीवर भाजपकरिता आता दीनदयाळ उपाध्याय हे ‘नवे नेहरू’ असल्याचे भासत असावेत. मुघलसराय रेल्वे स्थानकापासून कांडला बंदरापर्यंत व ग्रामीण कौशल्य योजनेपासून  ग्राम ज्योती योजनेपर्यंत अनेक प्रकल्प व कार्यक्रमांना केंद्र सरकारने दीनदयाळ यांचे नाव दिले आहे. गोव्यात दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना व दीनदयाळ स्वयंरोजगार योजनाही सुरू झाल्या आहेत.

-कौ. बा. देसाई, मडगांव

 

धन्य ते माजी आमदार आणि त्यांचे चिरंजीव!

‘माजी आमदार पुत्राला फसवणाऱ्या बाबाला अटक’ हे वृत्त (१४ ऑक्टो. ) वाचून अवाक् व्हायला झाले. आपल्या मुलाची वर्णी केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या महामंडळावर लावण्यासाठी महाराष्ट्रातील एक माजी आमदार एखाद्या भोंदूबाबाला तब्बल पावणेदोन कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम देतो. ही घटना राजकारणातील भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीची निदर्शक तर आहेच, परंतु त्याचबरोबर आपल्या मुलाचे राजकारणात बस्तान बसवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर निषिद्ध नसणारा बाप आणि केवळ बापाच्या संपत्तीच्या जीवावर राजकारणात मोठा होऊ  पाहणारा मुलगा यांची अनैतिक राजकीय महत्त्वाकांक्षाही दर्शवणारी आहे. भ्रष्ट, अनैतिक मार्गातून आलेल्या संपत्तीचा वापरच अशा कामांसाठी केला जातो.  धन्य ते माजी आमदार आणि धन्य त्यांचे चिरंजीव!

-रवींद्र पोखरकर, ठाणे

 

चष्माच उल्टा!

‘युवराजांची शिकवणी’ हा  ‘उल्टा चष्मा’ (१२ ऑक्टो.) वाचला. एरवी यातील लेखन तिरकस, बोचरे असते. बहुतांश वेळा शहा, मोदी दुक्कल किंवा भाजप समर्थक हेच या सदराचे लक्ष्य असतात. पण यावेळी चक्क ‘शहजादे’ असल्याने उत्सुकता वाटली. त्यांच्या अल्पबुद्धीतून त्यांनी संघावर जी मुक्ताफळे उधळली होती, त्यातून आपण फक्त संघ ‘हाफ पॅन्ट’ मधून ‘फुल पॅन्ट’मध्ये आला आणि राहुल गांधी यांना त्याचा पत्ता नाही इतकाच मथितार्थ काढलात. पण स्त्री-पुरुष समानता ही पॅन्टच्या लांबीवर अवलंबून नसते. ती बौद्धिक, सामाजिक, आर्थिक स्तर आणि एकमेकांप्रति आदर दाखवून व्यक्त होत असते. पण युवराजांना एवढी समज असली तर ना? आणि या सदरातही हा मुद्दा दुर्लक्षून त्यांच्यावर फक्त सौम्य कागदी बाण सोडले आहेत!

– मीना जोशी, पुणे