‘पायाच कच्चा’ हा ‘अन्वयार्थ’ (१४ जून) वाचला. मागील काही ‘असर’ अहवालामुळे शिक्षणक्षेत्रात मोठे वादंग निर्माण झाले होते. या अहवालांमुळे जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा अधिकाधिक मलीन झाली व यातूनच भूछत्राप्रमाणे गल्लोगल्ली इंग्रजी माध्यमांच्या शाळा मात्र फोफावल्या. जि. प. शाळा मरणशय्येकडे वळायला लागल्या.
मागील एका वर्षांत खऱ्या अर्थाने सर्व गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळा ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या अभियानामुळे समृद्ध झालेल्या आपणास दिसतील त्याचेच प्रतिबिंब ‘असर’च्या अहवालातही यंदा दिसून येते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा २२ पानी शासन निर्णय २२ जून २०१५ रोजी आला आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी तर मेहनत घेतलीच; पण यात शिक्षकांनी सर्वस्वी झोकून दिले. आजमितीस राज्यातील कुठल्याही जि.प. शाळेत गेल्यास स्पष्टपणे शाळेचे बदललेले वातावरण दिसेल. ‘प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या अभियानात मुले शाळेत येऊ लागली व आपणास काय येते हे बोलू लागली. ज्ञानरचनावादी आरेखनांतून, परिसरातील अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंतून मुलांचे भाषा व गणित या विषयाचे मूलभूत संबोध पक्के करावयास मदत झाली. म्हणजेच, एखाद्या सातवीतील मुलाला अजूनही वाचता येत नसेल तर, पहिलीसाठी तयार केलेल्या आरेखनातून तो शिकला. तसेच गणिताच्याही बाबतीत घडले आहे, मात्र अजूनही भागाकार किंवा दशांशावरील क्रिया करताना मुलांना अडचणी येतात, हे मान्य आहे. मात्र या अभियानात घेण्यात आलेल्या भाषा व गणित विषयाच्या दोन चाचण्यांमुळे मुले बऱ्याच अंशी प्रगल्भ झालेली दिसतील. शासनाने या वर्षी या अभियानात भाषा व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी खास प्रशिक्षणाचे आयोजन केले असून ते कुठल्याही शिक्षकावर बंधनकारक नसताना स्वेच्छेने ४०९० लोकांनी नोंदणी केलेली आहे.
एकदंरीत ‘असर’चा अहवाल विद्यार्थ्यांच्या वाचन/ गणित क्षमतांतील वाढ दाखवतो, तरी खऱ्या अर्थाने जि.प. शाळा मागील एका वर्षांत आत्मसन्मानाने उभ्या राहिल्या आणि शिकणे व शिकविणे या आंतरक्रियांनादेखील वेग आला.
–गौरी पाटील, नाशिक
आजही ‘अबला’च?
रुबिना पटेल यांच्या ‘संघर्ष-संवाद’ सदरातील ‘मुलींना समान अधिकार द्या’ हा लेख (१३ जून) वाचला. मुस्लीम स्त्रीला जी असमान आणि तुलनात्मक वागणूक मिळते तिला शह देण्यासाठी पटेल व त्यांच्या सहकारी करीत असलेल्या कामास दाद द्यायला हवीच. परंतु या लेखातील समीना, हनिफा, निकहत ह्य़ा सगळ्या मुली म्हणजे फक्त मुस्लीमच नाही तर सबंध भारत देशातील स्त्रियांना प्रतीत करतात. ‘वयात आली की तिच्या लग्नाविषयीच बोलले जाते’ ही परिस्थिती प्रत्येक भारतीय जात आणि धर्मात कमी जास्त प्रमाणात आहे. देवाच्या मंदिरापासून ते न्यायमंदिरापर्यंत सध्याची स्त्री ही आजही एक ‘अबला’च ठरवली जाते आहे, याबद्दल वाईट वाटते.
–प्रेमकुमार शारदा ढगे
‘सहकार’ आहे तोवर राष्ट्रवादी राहील
‘सहय़ाद्रीचे वारे’ या सदरात राष्ट्रवादी काँग्रेसची सद्य:स्थिती व भविष्याचा वेध घेतला आहे. राष्ट्रवादीचे राजकारण हे ‘सहकारा’वर अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा ‘बालेकिल्ला’ समजला जातो. २०१४च्या लोकसभा व विधानसभेला पार ‘पानिपत’ झाले असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले हे विसरता येणार नाही. सध्या सहकार शुद्धीकरणाच्या नावाने सरकार सहकार संपविते की काय, अशी धास्ती ऊस उत्पादकांची झालेली दिसते. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपला भरभरून मतदान करणारा शेतकरी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मात्र आघाडीच्या मागे गेला. त्या वेळी भ्रष्टाचार, घोटाळे किंवा इतर मुद्दे चालले नाहीत. विद्यमान केंद्र/ राज्य सरकारने शहरांकडेच अधिक लक्ष दिल्याने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप सरकारचीही कसोटी लागणार हे मात्र नक्की.
– सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी (ता. शिरूर, जि. पुणे)
राष्ट्रवादी ‘बाल्यावस्थेत’च राहील!
‘राष्ट्रवादी ‘प्रौढ’ होणार का?’ या लेखात (सह्य़ाद्रीचे वारे, १४ जून) राष्ट्रवादी नेत्यांच्या (कारण या पक्षात कार्यकर्ते जवळपास नाहीतच) गोंधळल्या परिस्थितीचे छान विवेचन केले आहे. या पक्षाची स्थापनाच मुळी सोनिया गांधी यांच्या विरोधाने झाली; पण सत्तेचे गाजर दिसताच शरद पवारांनी काँग्रेसशी जमवून घेतले. असा हा पक्ष जवळपास १५ वर्षे येनकेनप्रकारेण सत्तेत राहिला, त्यामुळे रस्त्यावर उतरून विरोध करणे मनात आणले तरी शक्य होत नाही. आधी काँग्रेसमधून, नंतर इतर पक्षांतील असंतुष्ट हेरून आणि त्याबरोबर ‘इलेक्टिव्ह मेरिट’ नावाखाली अगदी गावगुंडांनादेखील पक्षात प्रवेश देऊन उपकृत केले. अशा पक्षाकडून आपण कोणती अपेक्षा करणार? कधी काँग्रेसला, तर कधी भाजपला चुचकारण्यात गेली सोळा वर्षे कशीबशी निभावली; पण आता छगन भुजबळ, रमेश कदम तुरुंगात, तर अजित पवार, सुनील तटकरे यांचे भविष्य सांगायला किरीट सोमय्यांची गरज नसावी. ममता, जयललिता यांनी आपल्या मतदारांत जो विश्वास निर्माण केला आहे, तसा शरद पवार महाराष्ट्रात अजून तरी निर्माण करू शकले नाहीत. तेव्हा राष्ट्रवादी ‘प्रौढ’ कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर.. राष्ट्रवादी शेवटपर्यंत ‘बाल्यावस्थेतच’ राहणार हेच आहे.
– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई).
‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ला तर मृत्यू १७ जून १८९५ या दिवशी झाला. त्यांना केवळ ३९ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले. न्यू इंग्लिश स्कूलच्या संस्थापकांपैकी (१८८०) आगरकर एक होते. ‘केसरी’ वृत्तपत्राचे पहिले संपादक आगरकर होते. फग्र्युसन महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य आगरकर होते. जनप्रबोधनार्थ आगरकरांनी ‘सुधारक’ पत्र काढले. त्यातील एक लेख इंग्रजीत असे. तो गोपाळ कृष्ण गोखले लिहीत असत. ‘आपली मूळ प्रकृती म्हणजे भारतीयत्व न सोडता नवीन पाश्चिमात्य शिक्षणाचा आणि त्यासह ज्या नवनवीन शास्त्रीय कल्पना येतात त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करीत गेलो तरच आपला निभाव लागणार आहे.’ या शिकवणुकीचा प्रारंभ ‘सुधारक’च्या पहिल्या अंकापासून झाला. ‘इष्ट असेल ते सांगणार आणि शक्य असेल ते करणार’ हे ‘सुधारक’चे ब्रीद होते. ‘सुधारक’ने महाराष्ट्रात विवेकवादाचे बीजारोपण केले. ‘सुधारक’मधील ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या चौदा पानी लेखातील काही वाक्ये:-
‘हिंदूंनो! तुम्ही इतके गतानुगतिक का झालां आहांत? मेंढरांसारखे का वागता? जिवंत माणूस खातो ते पदार्थ मेलेल्याला अर्पण करता याचा अर्थ काय? मृताच्या नावें जें अन्न-पाणी देतां तें कोण घेतो? आत्म्याला नाक, तोंड, पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंत आणि मृत यांत भेद काय? खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत? ..बाप मेला तर मुलानें क्षौर केलेच पाहिजे असा हट्ट का? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केलें आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाण्याची धार अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब आहे, असें मुलाचें नटणें मृत बापाच्या आत्म्याला आवडतें हे तुम्हाला कसे समजले? कुणी सांगितले?’
– प्रा. य. ना. वालावलकर
‘चातुर्वण्र्य’ हाच वैदिक (कु)प्रभाव
प्रा. शेषराव मोरे यांचे माझ्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देणारे पत्र (लोकमानस, १४ जून) वाचले. त्यात भारतीय संस्कृतीवर वैदिक संस्कृतीचा प्रभाव व वाटा मोठा आहे असे प्रा. मोरे म्हणतात. डॉ. रा. ना. दांडेकर म्हणतात, ‘शैवप्रधान धर्मधारा हीच मूळची असून वैदिक धर्माचा उदय ही मध्योद्गत घटना असून आजच्या हिंदू धर्मावर तिचा विशेष प्रभाव नाही.’ (हिंदुइझम). प्रा. मोरे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा इतिहास’ या पुस्तकाचा हवाला देताना, ‘त्यांनी बौद्ध, जैन व लोकायत संस्कृतीचाही समावेश केला आहे’ असे म्हणतात. म्हणजे बौद्ध, जैन व लोकायत वैदिक संस्कृतीचेच भाग आहेत हा संघनिष्ठांचा समज ते पुढे नेऊ पाहतात. पण तर्कतीर्थच उपरोक्त पुस्तकात म्हणतात की ‘बौद्ध व जैन धर्म म्हणजे वैदिक परंपरेच्या विरुद्ध बंड करून निघालेली हिंदूंचीच पाखंडे होत.’ (पृष्ठ ३५३) लोकायतही याच बंडवाल्यांत आले व ही बंडे जेथे वैदिक धर्म प्रबळ होता त्या प्रदेशात, म्हणजे मगध प्रांतातच जन्माला आली, अन्यत्र नाहीत. मगध व कुरू-पांचालवगळता बौद्ध काळातही वैदिक धर्म अन्यत्र भारतीय उपखंडात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. मग अल्प वैदिक धर्म आणि बृहद् भारतीय संस्कृती याची सांगड घालत वैदिक वर्चस्वतावाद माजवायचे मुळात कारण काय?
आर्य वंश, आर्य संस्कृती व अनार्य वंश वा अनार्य संस्कृती अशी शब्दयोजना केली, तरी त्यातील वांशिक जाणिवांचा धागा सुटत नाही. आर्य संस्कृती (अथवा वंश) श्रेष्ठ व अनार्य संस्कृती (अथवा वंश) कनिष्ठ अशीच या सिद्धान्तांची मांडणी राहिली आहे. त्यातूनच वैदिक विरोधी द्रविडवाद व मूलनिवासीवाद उभा राहिला आहे व त्याने भारतीयांचे अपरंपार नुकसान केले आहे याची जाणीव आर्य-अनार्य संज्ञा वापरताना ठेवलेली चांगली. प्रत्यक्षात एतद्देशीय रहिवाशांच्या सिंधुपूर्व काळापासून चालत आलेल्या शैवप्रधान संस्कृतीचाच प्रभाव आजही सर्वव्यापी आहे. डॉ. दांडेकर म्हणतात त्याप्रमाणे वैदिक धर्म/संस्कृतीचा प्रभाव मात्र अत्यल्प आहे. चातुर्वण्र्य संकल्पना वैदिक असून तिचा पुढे गैरवापर करण्यात आला हे भारताचे सामाजिक वास्तव आहे. वैदिक संस्कृतीचा असलेला हाच काय तो भारतीय संस्कृतीवरील प्रभाव..जो कुप्रभावी ठरला. चातुर्वण्र्य प्रा. मोरे म्हणतात तशी ‘काल्पनिक संकल्पना’ नाही.
–संजय सोनवणी