क्रीडाज्योतीचे आगमन
इन्चॉन : आशियाई देशांमधील खेळाडूंसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची प्रतीक्षा संपत आली आहे. क्रीडाज्योतीच्या आगमनामुळे येथील वातावरण क्रीडामय झाले आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होत असून दोन आठवडय़ांच्या या स्पर्धेत दहा हजारहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. ही ज्योत उद्घाटन समारंभात स्टेडियमवर प्रज्वलित केली जाईल, त्या वेळी या ज्योतीच्या सहा हजार किलोमीटर अंतराच्या प्रवासाचीही सांगता होईल. ज्योतीच्या दौडीत कोरियाच्या अनेक माजी ऑलिम्पिकपटूंनी व संघटकांनी भाग घेतला.
कोरियाला हरवू -गुरुसाईदत्त
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या आर एम व्ही गुरुसाईदत्तने आशियाई क्रीडा स्पध्रेत कोरियाला हरवू, असा निर्धार प्रकट केला. थॉमस चषक बॅडमिंटन स्पध्रेत भारताने कोरियाकडूनच २-३ अशी हार पत्करली होती. ‘‘इन्चॉनमध्ये आम्ही कोरियाला हरवू अशी आशा आहे. त्यांच्या दोन्ही दुहेरीतील जोडय़ा बलाढय़ असल्यामुळे आम्ही तिन्ही एकेरीच्या लढती जिंकण्याचा प्रयत्न करू. हे आव्हानात्मक असले तरी आम्ही त्यांना पराभूत करू,’’ असा विश्वास गुरुसाईदत्तने सरावानंतर व्यक्त केला.
वेगवान पासिंगवर भर -सुनील
इन्चॉन : आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवान पासिंगवर आमचा भर असेल आणि त्यासाठी आम्ही कसून सराव केला आहे, असे भारताचा अनुभवी हॉकीपटू एस. व्ही. सुनीलने सांगितले.
भारतीय संघातील स्वत:च्या भूमिकेविषयी सुनील म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मानसिक दडपण आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी धारदार आक्रमणाची आमची योजना आहे. वेगवान चाली करीत गोल नोंदविण्याचा प्रयत्न करणे किंवा किमान पेनल्टी कॉर्नर मिळवून देणे यासाठी माझ्यावर संघाची भिस्त आहे.’’