मालिकेतल्या खलभूमिका साकारणाऱ्यांचं काम चोख झालं की, त्यांना पुन्हा नवी खलभूमिका मिळालीच म्हणून समजा. पण, यात आता बदल होताना दिसतो. खलभूमिका साकारणारे कलाकार सध्या काही मालिकांमध्ये मुख्य-भूमिकांच्या खुर्चीत जाऊन बसलेत.

‘पुढचं पाऊल’मधली कल्याणी कट-कारस्थानं करताना दिसली तर तमाम कल्याणी फॅन्सच्या भुवया उंचावतील. ‘कमला’मधली साध्या-सोज्वळ शरयूने जर सासूच्या विरोधात काही कट रचला तर समस्त सासूवर्ग मोर्चा वगैरे काढतील. किंवा ‘जयोस्तुते’मधून न्यायाच्या गोष्टी करणारी प्रगतीच दुसऱ्यांवर अन्याय करताना दिसली तर प्रेक्षकांसाठी तो धक्का असेल. या ‘जर-तर’च्या गोष्टी जरा वेळ बाजूला ठेवू या आणि फ्लॅशबॅकमध्ये जाऊ या. शरयू, कल्याणी आणि प्रगती यांनी अशी कामं पूर्वी केलीच आहेत. पण, अनुक्रमे अभिलाषा, लावण्या आणि प्रिया म्हणून. अर्थात, ‘मला सासू हवी’, ‘तुजवीण सख्या रे’ आणि ‘तू तिथे मी’ या मालिकांमधून. तात्पर्य असं की, सध्या मालिकांमधून झळकत असलेल्या मुख्य कलाकारांनी यापूर्वी नकारात्मक भूमिका केल्या आहेत. ‘जय मल्हार’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘होणार सून मी या घरची’ ही त्यांपैकीच काही मालिकांची नावं. एखाद्या मालिकेत नकारात्मक भूमिका केल्यानंतर दुसऱ्या मालिकेसाठी सकारात्मक आणि मुख्य भूमिका मिळणं हे कलाकारांसाठी आनंदाचंच आहे. एका साच्यात न राहता कलाकारांचे अभिनयाचे विविध पैलू यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येताहेत.
एखाद्या कलाकाराने एका मालिकेत काम केलं की, त्यातल्या त्याच्या व्यक्तिरेखेमुळे त्याची ओळख निर्माण होते. मालिकेमुळे तयार झालेली ही ओळख दीर्घकाळ टिकते. प्रेक्षकांच्या लक्षात राहते. प्रेक्षकांच्याच नाही तर इंडस्ट्रीतल्या लोकांच्याही चांगलीच लक्षात राहते. मग एखाद्या कलाकाराने एखादी व्यक्तिरेखा उत्तमरीत्या वठवली की, त्याला तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी मागणी असते. पण, मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सध्या काहीसं वेगळं घडताना दिसत आहे. आधीच्या मालिकांमध्ये कारस्थान करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारलेले कलाकार सध्या सुरू असलेल्या मालिकांमधून साध्या, सोज्वळ, प्रेमळ व्यक्तिरेखांमधून दिसताहेत. ‘पुढचं पाऊल’मधील जुई गडकरी, ‘जय मल्हार’मधील देवदत्त नागे, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’मधील रश्मी अनपट, ‘कमला’मधील दीप्ती केतकर, ‘जयोस्तुते’मधील प्रिया मराठे, ‘होणार सून मी या घरची’मधील शशांक केतकर ही आताची काही लोकप्रिय नावं. ही नावं लोकप्रिय झाली ते त्यांच्या अभिनयामुळे आणि व्यक्तिरेखेमुळे. पण, या कलाकारांनी याआधी काही मालिाकांमधून त्यांच्या नकारात्मक भूमिकेचंही कौशल्य दाखवलं आहे.
जुई गडकरीने याआधी ‘तुजवीण सख्या रे’ या मालिकेत लावण्या ही खलनायिका साकारली होती. ग्लॅमरस, नायकावर हक्क गाजवणारी, स्वतंत्र विचारांची लावण्या प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. ‘पुढचं पाऊल’मधल्या कल्याणीसोबतच प्रेक्षक जुईला आज लावण्या म्हणूनही आवर्जून ओळखतात. याबाबत जुई सांगते, ‘मी ‘तुजवीण सख्या रे’ करत असताना मला कळलं की माझा ट्रॅक आता संपवताहेत. अचानक हा निर्णय माझ्यासमोर आल्याने मी जरा बिचकले. वाईटही वाटलं. त्याच दरम्यान मला ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या ऑडिशनसाठी आयरिस प्रॉडक्शनमधून फोन आला. हो-नाही करत मी ऑडिशनला गेले आणि तिथे दिवसभर माझी ऑडिशन, लुक टेस्ट सुरू होतं. दुसऱ्या दिवशी ‘तुजवीण सख्या रे’च्या सेटवर आल्यावर ‘पुढचं पाऊल’साठी माझी निवड झाल्याचं मला कळलं. सुखद धक्का होता तो.’ खऱ्या आयुष्यात जुई मस्तीखोर, बिनधास्त असल्यामुळे तिला लावण्या करताना मजा आली पण, कल्याणी साकारताना काही बदल करावे लागल्याचं ती सांगते. ‘कल्याणी गावातली मुलगी आहे. त्यामुळे तिच्यातला अति साधेपणा मला आत्मसात करावा लागला. विशेषत: देहबोलीचा अभ्यास करावा लागला. खऱ्या आयुष्यात मी तशी नसल्यामुळे मला त्यावर अधिक लक्ष द्यावं लागलं’, ती सांगते. विशिष्ट प्रतिमेत अडकून पडायची भीती जुईला वाटत नाही. मिळणारी भूमिका आत्मविश्वासाने करण्याचा तिचा प्रयत्न आहे. पण, ‘आता गुडी-गुडी भूमिका चार वर्षांपासून साकरातेय. त्यामुळे पुढच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादी रिअ‍ॅलिस्टिक भूमिका साकारायची आहे. मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक’, असंही सांगायला ती विसरत नाही.
भूमिका कोणतीही असो, अभ्यास करून त्या भूमिकेला न्याय देणं हे कलाकाराच्या हातात असतं; याच मताची रश्मी अनपटही आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतल्या ईश्वरीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. ‘खरं तर मी ‘असावा सुंदर..’मालिकेसाठी ईश्वरी आणि अंकिता अशा दोन्ही भूमिकांसाठी ऑडिशन दिलं होतं. पण, मालिकेच्या टीमला माझ्यात ईशू दिसली असावी. यापूर्वी मी ‘सुवासिनी’ आणि ‘पुढचं पाऊल’ या दोन मालिकांमध्ये खलनायिका साकारली होती. त्यामुळे नवीन मालिकेत मुख्य भूमिकेसाठी निवड व्हावी, हा माझ्यासाठीही मोठा बदल होता. नकारात्मक भूमिका केली की प्रेक्षकांचा राग आपोआपच त्या त्या कलाकारासाठी व्यक्त होत असतो. सकारात्मक भूमिका करताना प्रेक्षकांचं प्रेम मिळवणं जरा कठीण असतं. पण, तुमचा तुमच्या कामावर विश्वास हवा, तर तेही फार कठीण नाही. मी स्वत: खूप शांत आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाने वावरत असते. त्यामुळे खलनायिका साकारताना माझ्यासाठी आव्हान होतं,’ असं रश्मी सांगते. रश्मीलासुद्धा आजही तिने साकारलेल्या खलनायिकेवरून अर्थात ऐश्वर्या म्हणून ओळखलं जात असल्याचं ती सांगते.
खरं तर कलाकाराने एखाद्या मालिकेत सर्वोत्तम काम केलं की त्याचाही विशिष्ट बाज ठरतो. मग करिअरची सुरुवात आहे म्हणून काही कलाकार एकाच प्रकारच्या भूमिका स्वीकारतातही. यामुळे त्या कलाकाराचे अभिनयाचे इतर पैलू प्रेक्षकांसमोर येत नाहीत किंवा उशीर होतो. विनोदी कलाकारांच्या बाबतीत हा प्रकार प्रामुख्याने घडताना दिसतो. एखाद्या स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये काम केलं, तिथे कामाची सगळ्यांकडून वाहवा मिळाली, पुरस्कार मिळाले की त्यापुढच्या अनेक पुरस्कार सोहळ्यांमधील स्किट्समध्ये हे कलाकार दिसतात. एका सोहळ्यात दिसले की दुसऱ्या मग तिसऱ्या अशी साखळी सुरू होते. मग त्या कलाकारांची क्षमता असूनही त्यांच्या अभिनयाची दुसरी बाजू फारशी समोर येत नाही. असंच काहीसं नकारात्मक भूमिका म्हणजे खलभूमिका साकारणाऱ्या कलाकारांचं होतं. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा खलभूमिकांना प्रचंड मागणी. आणि ती उत्तमरीत्या वठवणाऱ्यांनाही तेवढीच मागणी. ‘तो कलाकार खलनायक चांगला साकारतो. तोच आपल्या मालिकेचा व्हिलन’, ‘तिचा खलनायिकेचाच लुक आहे. खलनायिकेच्या भूमिकेत ती फीट बसेल’ असे अलिखित नियम होऊन जातात. मग सध्या टीव्हीवर ही ‘इमेज’ बदलताना दिसतेय. हा बदल टीव्ही इंडस्ट्रीच्या बदलत्या दृष्टिकोनाचा साक्षीदार म्हणावा लागेल. कलाकारांनाही विशिष्ट अशा एका बाजात अडकून पडायचं नसतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा बदल फायदेशीरच ठरतोय.
नकारात्मक ते सकारात्मक या प्रवासाचं आणखी एक उदाहरण म्हणजे ‘जय मल्हार’या मालिकेतील खंडोबा साकारणारा देवदत्त नागे हा अभिनेता. ‘देवयानी’ या मालिकेतला सम्राट सगळ्यांनाच लक्षात असेल. मारहाण करणारा, घरात आरडाओरडा करणारा, घरच्यांच्या विरोधातच कारस्थानं करणारा सम्राट आजही अनेकांना आठवतो. या सम्राटचं अर्थात देवदत्त नागेचं वेगळ रूप बघायला मिळालं ते ‘जय मल्हार’मध्ये. ‘काही वेळ घरातल्या भावंडांपैकी एकाला डावेपण अनुभवायला लागतं. ते ‘देवयानी’मधल्या सम्राटच्या नशिबात येतं. मी मोठा आहे पण, मला कोणीच विचारत नाही, भाव देत नाही असा नकारात्मक दृष्टिकोन त्याच्या मनात रुजतो आणि म्हणून तो इतरांचं वाईट करून स्वत:च्या पदरात सुख वेचण्याचा प्रयत्न करत असतो. ही भूमिका साकारताना नक्कीच मजा आली. पण, खंडोबा साकारताना अनेक गोष्टी नव्याने उमगू लागल्या. ‘जय मल्हार’साठी निवड झाली खरी पण, प्रेक्षक मला स्वीकारतील का याचे विचार सतत सुरू होते. पण, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं’, देवदत्त सांगतो. याआधी ‘वीर शिवाजी’मध्ये तानाजी, ‘मृत्युंजय’मध्ये दुर्योधन, ‘कालाय तस्मै नम:’मध्ये कृष्णा पाटील या भूमिकाही त्याने साकारल्या आहेत. कलाकाराने पूर्णत: भूमिकेत शिरू नये असं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणतो, ‘कलाकार जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा तो त्यात १०० टक्के असतो असं म्हणतात. पण, माझ्या मते कलाकाराने ९९ टक्के त्या भूमिकेत असावं आणि एक टक्का राखून ठेवावा. कारण तो एक टक्का त्या भूमिकेतून पुढच्या भूमिकेसाठी जाताना उपयोगी ठरतो. कलाकार स्वच्छ पाण्यासारखा असावा. कोणताही रंग त्यात टाकला की ते पाणी त्या रंगाचं होऊन जावं.’ खंडोबाची भूमिका साकारल्यानंतर यापुढे शक्यतो नकारात्मक भूमिका करणार नाही, असंही तो आवर्जून सांगतो.
‘तू तिथे मी’मधील प्रिया ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. ती साकारली होती प्रिया मराठे हिने. तिची बोलण्याची लकब, सादरीकरण, देहबोली अशा सर्वार्थाने ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लक्षात राहिली. पर्यायाने ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रिया मराठेचंही तितकंच कौतुक झालं. खुबीने खल भूमिका साकारल्यानंतर खल भूमिकांच्याच ऑफर्स मिळणं स्वाभाविक होतं. प्रियाला तशा ऑफर्स मिळाल्याही असतील, पण तिने स्वीकार केला वेगळ्या भूमिकेचा; ‘जयोस्तुते’मधल्या प्रगती या वकिलाच्या भूमिकेचा. ‘तू तिथे मी’मधल्या इमेजसारखीच प्रियाला ‘जयोस्तुते’मधल्या प्रगतीला भरभरून प्रेम मिळालं. असंच काहीसं झालं ते दीप्ती केतकर हीचं. ‘मला सासू हवी’ या मालिकेतल्या मोठय़ा सुनेची म्हणजे अभिलाषाची व्यक्तिरेखा दीप्तीने उत्तमरीत्या वठवली होती. मोठय़ा सुनेचे हक्क आपल्याला मिळायलाच हवेत या साध्या हेतूने ती कारस्थानं करायची. ही भूमिका खल भूमिकेकडे झुकणारीच होती. पण त्यानंतर ‘कमला’ या मालिकेतल्या शरयूसाठी तिची निवड झाली. शरयू हीदेखील अभिलाषासारखीच एका घराची सून आहे. पण दोन्ही व्यक्तिरेखा दोन टोकाच्या आहेत. शरयू सकारात्मक भूमिकेतली आहे. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतला श्रीरंग म्हणजे आदर्श मुलगा. पण श्रीरंग साकारणाऱ्या शशांक केतकरने ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेत एका ट्रॅकसाठी खल भूमिका साकारली होती. तो सांगतो, ‘मी ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेच्या आधी ‘कालाय तस्मै नम:’ या मंदार देवस्थळींच्याच मालिकेमध्ये सकारात्मक भूमिका केली होती. मंदारला ती भूमिका आवडली होती. कौटुंबिक माणूस कसा असेल हे त्याने माझ्या त्या भूमिकेतून कल्पना केली होती. म्हणून ‘होणार सून..’साठी माझी निवड झाली.’ कोणत्या प्रकारची भूमिका आवडते असं विचारल्यावर शशांक थोडंसं वेगळं उत्तर देतो. ‘कलाकार एखाद्या भूमिकेचा स्वीकार करतो, कारण त्याला ती भूमिका साकारताना मजा येणार असते. त्यामुळे भूमिकांच्या आवडीनिवडीचा प्रश्न येत नाही. ‘होणार सून.’मुळे ओळख मिळाली आहे. तसंच ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकातल्या कुणाललाही प्रेक्षक जवळ करताहेत. किंबहुना या नाटकातला कुणाल प्रेक्षकांना जास्त भावतो’, असं शशांक सांगतो.
मालिकांमध्ये झालेल्या या बदलामुळे कलाकारांमध्येही आता सकारात्मक दृष्टिकोन आला आहे. तसंच त्यांना त्यांचं अभिनयकौशल्य दाखवण्याची संधीही मिळतेय. पर्यायाने प्रेक्षकांना कलाकारांमधलं हे वैविध्य दिसून येतंय. टीव्ही इंडस्ट्रीत होत असलेल्या बदलांपैकी हा एक सकारात्मक बदल आहे असं म्हणावं लागेल.