गणेशाचे रूप चमत्कारिक असल्यामुळे सर्वाना त्याच्याबद्दल कुतूहल वाटते. मुळातला हा हत्तीरूपी देव. त्याला मानवी रूप नंतर दिले गेले. हे कसे घडले, यासंबंधीचा पुरातत्त्वीय व वाङ्मयीन पुरावा उपलब्ध आहे. त्यावरून हा गज गण कसा झाला आणि त्याची परिणती गणेशात कशी झाली याची कल्पना येते..

श्रीगणेश हे हिंदूंचे एक अत्यंत महत्त्वाचे दैवत आहे. ती विद्येची देवता आहे. प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी त्याची पूजा केली जाते. त्याच्या उगम आणि विकासासंबंधी अनेक विद्वानांनी आपली मते मांडली आहेत. परंतु, त्यांनी केवळ दंतकथांच्या आधारे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यासंबंधी ठाम, विश्वसनीय पुरावा मात्र कोणीही दिलेला नाही.
गणेशाचे रूप चमत्कारिक असल्यामुळे सामान्यजनांनाही त्याच्याबद्दल कुतूहल आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे हा हत्तीरूपी देव- त्याला मानवी रूप नंतर दिले गेले. हे सर्व कसे घडून आले यासंबंधीचा पुरातत्त्वीय पुरावा आणि त्याला उपोदबलक वाङ्मयीन पुरावा उपलब्ध आहे. त्यावरून हा गज गण कसा झाला आणि त्याची परिणती गणेशात कशी झाली याची कल्पना येते.
पुरातत्त्वीय पुरावा
हिंदू धर्मात प्राणिपूजा प्रचलित आहे आणि प्राचीन काळीही ती होती. हत्तीसारख्या प्रचंड प्राण्याबद्दल कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधु संस्कृतीच्या मुद्रांवर तो दिसतो. तेव्हा त्या लोकांच्या धार्मिक समजुतीमध्ये हत्तीला स्थान असावे यात शंका नाही.
गणेशाची प्राचीनता वैदिक काळापर्यंत मागे नेली जाते. परंतु, अथर्वशीर्षांतील गायत्री ही ब्रह्मणस्पतीची आहे, गजमुखी गणेशाची नव्हे, परंतु, ऋग्वेदात ‘पेदु’, ‘पिदु’, ‘पिरु’ अशा एका प्राण्याचा उल्लेख येतो. तो इंद्रासारखा शक्तिमान असून, त्याच्या डोक्यातून सुरा वाहते, असे वर्णन आहे. पेदु, पेरू, पिरू याचेच रूप पिलु म्हणजे हत्ती. ‘पिलुशार’ हे एक हत्तीच्या रूपात असलेले दैवत कपिशा (हल्लीचे अफगाणिस्तानातील बेग्राम) या नगरीची अधिष्ठात्री देवता होती, असे ह्य़ुएन-त्संग (६२९-४५) या चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे. नगराच्या जवळच्या डोंगरात त्याचे वास्तव्य असे. पिलुशारचा पुढे दक्षिण भारतात पिल्लेयार गणपती झाला.
कपिशा ते तक्षिला या गांधार देशात एक हस्तिनायन नावाची लढवय्यी जमात फार पूर्वीपासून राहत होती. अलेक्झांडरने त्यांचा पराभव केला. त्यांचा राजा हस्तिन, तेव्हा हत्ती हे त्यांचे कुलचिन्ह (ळ३ीे) होते यात शंका नाही. खरे म्हणजे या गांधार देशात हत्तीशी संबंधी अनेक ग्रामनामे आहेत. उदा.- कपिशा (कपि-हत्ती), देवलोक, हस्तनगर इ. तक्षशिलेत एक पवित्र हत्ती होता. तो शहराच्या मध्यभागी एक मंडपात असे. लोक त्याची पूजा करीत. अलेक्झांडरही त्याची पूजा करीत होता. इतकेच नव्हे तर त्याच्या एका नाण्यावर त्याने हत्तीचे शिर डोक्यावर घेतल्याचे दाखविले आहे.
कपिशा नगरीचा ‘पिलुशार’ तिच्या नाण्यावर कोरलेला आहे आणि त्यावरील लेखात ‘कपिशिये नगरदेवता’ असा स्पष्ट उल्लेख आहे. हे नाणे इ.पू. १८७ मधील आहे. इंडो-ग्रीक राजांपैकी अँटिआलकिडासच्या नाण्यावर दोन पायावर उभा असलेला हत्ती आहे. येथे त्याला मानवी रूप देण्यास सुरुवात झाली असे म्हणता येईल. संपूर्ण मानवी स्वरूपात तो हर्मेसच्या (इ.पू. ५०) नाण्यावर दाखविला आहे. तो स्पष्ट गजमुखी गणेश आहे. तो ग्रीक शिल्पांसारखा पिळदार शरीराचा आहे व सिंहासनावर बसलेला आहे.
येथून पुढे कुषाण काळात (इ.स. पहिले-तिसरे शतक) गजाननाच्या मूर्ती कोरण्यात आल्या. या काळातील सुमारे ४० मूर्ती मथुरा संग्रहालयात आहेत. त्या बुटक्या व जाडजूड असून, यक्षप्रतिमांसारख्या दिसतात. त्यात गणेश उभा दाखविलेला असून, त्याला दोन हात आहेत, परंतु त्यात मोदक पात्र किंवा इतर आयुधे नाही. शिवमूर्तीच्या शिल्पपटात जे गण दाखविले असतात, त्यासारखा तो दिसतो. हे गण विघ्न निर्माण करणारे असतात. त्यांचा मुख्य म्हणजे गजमुखी गणेश. त्याने विघ्न निर्माण केले, तरी त्याची पूजा करून त्याची तुष्टी केली म्हणजे तो विघ्नहर्ता होतो. त्यामुळे इ.स. पाचव्या शतकापासून गणेशाची लोकप्रियता खूप वाढली हे त्याच्या असंख्य मूर्तीवर दिसून येते.
वाङ्मयीन पुरावा
गणेशासंबंधी भरपूर वाङ्मयीन पुरावा उपलब्ध आहे. परंतु, विश्वसनीय पुराव्याशिवाय तो ग्राह्य़ धरणे योग्य ठरणार नाही. उदाहरणार्थ शुक्ल यजुर्वेदीच्या मैत्रायणीसंहितेत रुद्र या देवतेचे वर्णन ‘शतरुद्रियात’ आहे. त्यात ‘कराट’ (हत्तीसारखे कान असलेला), ‘दन्ती’ (हत्तीसारखे दात असलेला), ‘हस्तिमुख’ अशी विशेषणे त्याला दिलेली आहेत. तेत्तिरीय अरण्यकातील ‘तत्पुरुषायविद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्’ हे वर्णन गणेशाला लागू पडते. परंतु, ते खूपच नंतरच्या काळात घुसडण्यात आले, हे विद्वानांनी दाखवून दिले आहे. गणपत्य पंथाचा उदय ९-१० व्या शतकात झाला त्या वेळी हे केले असावे.
मास्काच्या निरुक्तातील (इ.पू. ६ वे शतक) ‘देवता खण्डात गणेशाचा उल्लेख नाही. पाणिनी (इ.पू. ५ वे शतक) विशाखाचा (कार्तिकेय) उल्लेख करतो, पण गणेशाचा नाही. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रात’ (इ.पू. ४ थे शतक) आणि पतंजलीच्या ‘महाभाष्यातही (इ.पू. २ रे शतक) नाही. परंतु, हत्ती हा प्राणी काही जमातींना पवित्र असावा. बौद्धांच्या एक जातकथेत ‘हत्तीमह’ नावाच्या एका उत्सवाचे वर्णन आहे. त्यात पवित्र हत्तीला लौकिक देवता म्हटले आहे.
महाभारतात गणेश आहे, पण रामायणात नाही. महाभारतात शिवगणांचे विनायक आहेत. ते उपकारकर्तेही आहेत आणि उपद्रवीही आहेत. कुठलेही कार्य सुरू करताना ते सिद्धीस जावे म्हणून विनायकाची शांती करावी असे सांगितले आहे. त्यामुळे विघ्नकर्त्यांचा तो विघ्नहर्ता होतो. पुराणात गणेशासंबंधीच्या अनेक कथा आहेत.
गणेश विघ्नहर्ता झाल्यामुळे गुप्त काळापासून त्याची लोकप्रियता वाढू लागली. या काळात भारतीयांचे आग्नेय आशियात मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. सुरुवातीस व्यापाराच्या निमित्ताने गेलेली ही मंडळी कालान्तराने तेथे स्थायिक झाली. आग्नेय आशियात प्रवास करताना त्यांना घनदाट जंगले, प्रचंड नद्या पार कराव्या लागत. शिवाय वन्य जमातींशी सामना करावा लागे. हे सारे निर्विघ्न व्हावे म्हणून गणेशाच्या छोटय़ा मूर्ती त्यांनी आपल्या बरोबर नेल्या. त्यामुळे सर्व आशियाभर (पश्चिम सोडून) गणेशाचा प्रसार झाला. इंडोनेशियात तर गणेशाची मंदिरे आहेत आणि त्यांच्या इतका भव्य मूर्ती भारतातही नाहीत. जपानमध्येसुद्धा आजही गणेश मंदिर आहेत.
गण ते गणेश
सर्वधर्मसमभाव हे कुषाण राजांचे धोरण होते. कुषाणकालीन गणेशमूर्ती बुटक्या, तुंदिलतनु आहेत. त्यांना वाहन नव्हते, ते नंतर आले. त्या मूर्ती विघ्नकर्त्यां विनायकाच्या वाटतात. त्या काळात त्यांचे मूर्तिविज्ञान पक्के झाले नव्हते. पुढे ५-६ व्या शतकात ते झाले. त्या वेळी त्याला देवत्व प्राप्त झाले. वराहमिहिराच्या ‘बृहत्संहितेत तो चार हाताचा, मोदक पात्र, अंकुश, परशु व तुटका दात घेतलेला असावा असे सांगितले आहे.
गुप्तकाळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. मंदिराचा एक नवा आलेख तयार केला गेला. त्यात गणेश मूर्तीना स्थान मिळाले. परंतु, गणेशाची स्वतंत्र मंदिरे बांधली गेली नाहीत. त्याच्या मूर्तीना मंदिराच्या भिंतीच्या बाहेरचे स्थान मिळाले. तो शिवपरिवारातील एक दुय्यम देव होता. सातव्या शतकात त्याचे वाहन आणि त्याची शक्तीही दिसते.
आठव्या शतकात मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर मध्यभागी त्याला स्थान दिले गेले. त्याला गणेशपट्टी म्हणतात. गणेशाचे स्त्रीरूप गणेशानीच्या मूर्ती ९-१० व्या शतकात कोरण्यात आल्या. येथपासून पुढे गणेशाच्या अगणित मूर्ती आढळतात. त्याचे महत्त्व इतके वाढले, की १० व्या शतकात गाणपत्य पंथाचा उदय झाला आणि गणेशपुराण रचले गेले.
गणेशाची लोकप्रियता पाहून बौद्ध आणि जैन धर्मीयांनी त्याला आपल्या धर्मात स्थान दिले. आग्नेय आशियातील गणेश हिंदू तर मध्य आशिया, चीन, जपान येथे तो बौद्धांचा देव होता. सर्व महत्त्वाच्या धर्मात आणि जवळजवळ सर्व आशियाभर पूजला जाणारा हा एकच देव आहे. गज-गण-गणेश-महागणेश असा हा विनायकाचा प्रवास होता.    

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !