१८ मेच्या ‘लोकरंग’मधील ‘फळे आरोग्यास उपयुक्त!’ हा डॉ. हर्षद दिवेकर यांचा ‘फळांचा मोह टाळा’ या माझ्या लेखावरील प्रतिक्रियात्मक लेख वाचला. ‘फळांचा मोह टाळा’ हा लेख सर्दी, सायनसायटिस, दमा अशा कफज विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी होता; सरसकट सर्वासाठी नव्हता. मला आलेल्या अनुभवांवर आधारीत मी माझे नवीनच सिद्धान्त रचतेय, असा डॉ. दिवेकरांचा गैरसमज झालेला दिसतो. स्वत:च्या त्रोटक अनुभवांवर आधारीत नवीन सिद्धान्त रचण्याची सोय आयुर्वेदशास्त्रात नाही. शिवाय मी कुणी संशोधकही नाही. शास्त्रात सांगितलेला विषय सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावा म्हणून मी माझे अनुभव केवळ दृष्टान्तस्वरूपात सांगितले आहेत. दृष्टान्त हे सिद्धान्ताच्या पुष्टय़र्थ असतात, इतकेच.
सर्दी, ताप असे सर्वच आजार विषाणूंमुळे होतात असे डॉक्टर म्हणतात. आयुर्वेदशास्त्राच्या मते, ‘निजागन्तु विभागेन तत्र रोगा: द्विधा स्मृता:।’ रोग दोन प्रकारचे- निज आणि आगंतु. आगंतु म्हणजे बाह्य कारणांनी होणारे (उदा. अपघात, जीवाणू/ विषाणूजन्य इ.). निज म्हणजे शरीरातील घटक बिघडून होणारे (याला आहारविहारातील चुका कारणीभूत असतात.) रोग. आयुर्वेदशास्त्राची ही स्वतंत्र संकल्पना आहे. ‘सगळय़ा रोगांना विषाणू कारण’ ही संकल्पना आयुर्वेदात नाही. माझ्या यापूर्वीच्या लेखात मी याचे स्पष्टीकरण दिले आहे. (विस्तारासाठी ‘वाग्भट सूत्रस्थान’ अध्याय ११- १२ बघावे.)
आयुर्वेद हे एक शास्त्र असून त्या शास्त्राचे स्वतंत्र सिद्धान्त आहेत. त्यामुळे या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींना अन्य शास्त्राच्या आधारे विरोध करणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्राचे मूलभूत सिद्धान्त समजून घ्यायला हवेत. आंबट फळांनी कफाचे विकार होतात, हे प्रत्यक्ष सिद्ध आहे; रुग्ण हे अनुभवतातच.
थोडे गोड फळांबाबत- ‘क्ष्माम्बोग्निक्ष्माम्बुतेज:ख वाय्वग्न्योऽ निलगोऽ निलै:’ या सिद्धान्ताप्रमाणे पृथ्वी आणि जल महाभुतापासून मधुर रसाची उत्पत्ती होते. मधुर रस पचनासाठी ‘गुरुत्तम’ आहे. ‘मधुरं श्लेष्मलं प्रायो’, ‘मधुरं परमं गुरु:’ ‘कुरुतेऽत्युपयोगेन स मेद: कफजान गदान्’ ही वाग्भटाचार्याची सूत्रे त्यांचे कफकारत्व सिद्ध करतात.
राहता राहिला विषय संशोधनाचा. आयुर्वेदाचे सिद्धान्त हे हजारो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी संशोधनाअंती लिहिले आहेत. (कालौघात त्याची सांख्यिकी नष्ट झाली; निष्कर्ष मात्र टिकून आहेत.) त्या संशोधनाचे वर्णन आयुर्वेदाच्या संहितांमध्ये आढळते. (जिज्ञासूंनी तद्विद्य संभाषा, पंचावयव वाक्य, तंत्रयुक्ती, इ. अभ्यासावे.) त्यानंतर हजारो र्वषे हे सिद्धान्त अब्जावधी माणसांवर वापरून झाले आहेत आणि आजही ते खरे ठरतात. (उदा. त्रिदोष सिद्धान्त, पांचभौतिक सिद्धान्त, रसवीर्यविपाक सिद्धान्त, इ.) या अर्थाने आयुर्वेद हे शाश्वत शास्त्र आहे. यावर पुन्हा कोटय़वधी रुपये खर्च करून संशोधन करायचे आणि ते खरे आहे म्हणायचे, हा उपद्व्याप झाला. ‘प्रत्यक्षं ही अल्पं, अनल्पं अप्रत्यक्षम्’ अशा अनल्प अप्रत्यक्षाचाही विचार ऋषिमुनींनी केल्यामुळे शास्त्राला शाश्वतत्व प्राप्त झाले आहे. असे शाश्वतत्व प्राप्त होईपर्यंत प्रत्येक शास्त्रातील शास्त्रज्ञांना संशोधनाची धडपड करावीच लागते. आयुर्वेदातील आचार्यानी ती धडपड पूर्वीच केली आहे. नवीन शास्त्रांसाठी ती आता करावी लागतेय, इतकेच!